Russia Ukraine War: रशिया आपल्याच जखमी सैनिकांचा घेतोय जीव? समोर आला धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 12:41 PM2022-05-17T12:41:17+5:302022-05-17T12:43:08+5:30
Russia Ukraine War: सैनिकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याऐवजी त्यांच्यावर गोळी झाडून त्यांचं जीवन संपवत आहे. आतापर्यंत अशा शेकडो सैनिकांना त्यांच्या कमांडरने मारलं.
Russia Ukraine War: रशिया आणि यूक्रेनमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. अशात वेगवेगळे दावे केले जात आहेत. यातीलच एक दावा म्हणजे रशिया यूक्रेन युद्धात जखमी झालेल्या आपल्या सैनिकांवर उपचार करण्याऐवजी त्यांना जीवे मारत आहेत. ब्रिटीश न्यूज वेबसाइट 'डेली मेल' हा दावा केला आहे. वेबसाइटने सांगितलं की, रशिया आपल्या जखमी सैनिकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याऐवजी त्यांच्यावर गोळी झाडून त्यांचं जीवन संपवत आहे. आतापर्यंत अशा शेकडो सैनिकांना त्यांच्या कमांडरने मारलं.
'डेली मेल'नुसार, रशियाच्या सैनिकांनी आपल्या एका लेफ्टिनंट कर्नलवर जखमी सैनिकांवर गोळ्या झाडल्याचा आरोप लावला आहे. वेबसाइटनुसार, कमांडरने आपल्या एका जखमी सैनिकाला विचारलं की, तू चालू शकतो का? जेव्हा त्याने नाही असं उत्तर दिलं तेव्हा अधिकाऱ्याने त्याला लगेच जीवे मारलं. डेलीमेलने सांगितलं की, अशाप्रकारची एक नाही तर अनेक घटना घडल्या.
'डेली मेल' ने हा दावा यूक्रेनी पत्रकार वोलोडिमिर जोल्किनने बनवलेल्या एका व्हिडीओ क्लिपच्या आधारावर केला आहे. या क्लिपमध्ये यूक्रेनी सैनिकांकडून बंदी बनवण्यात आलेल्या रशियन सैनिकांची मुलाखत घेण्यात आली आहे. ज्यात कथितपणे सैनिक आपल्याच रशियन कमांडरवर हत्या आणि गैरवर्तनाचा आरोप लावताना दिसत आहे.
ही बातमी किती खरी आहे याबाबत ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. मात्र, रशिया आणि यूक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासूनच दोन्ही देशांमध्ये इन्फॉर्मेशन वारफेअरही सुरू झालं आहे. ज्यात एकमेकांविरोधात चुकीच्या बातम्या पसरवून दुसऱ्यांचं मनोबल खचवण्याचं काम केलं जात आहे. यूक्रेनच्या या इफॉर्मेशन वॉरफेअरमध्ये पाश्चिमात्या मीडिया खासकरून ब्रिटन आणि अमेरिका जोरदार साथ देत आहे. पण अशात बातम्यांच्या विश्वासार्हतेची पुष्टी करणं अवघड होतं.