रशियाने युक्रेनवर भीषण हल्ले सुरुच ठेवले आहेत. यामुळे लाखो युक्रेनी नागरिकांनी युद्धभूमी सोडली असून त्यांनी शेजारच्या देशांमध्ये आसरा घेतला आहे. कीव्ह अमेरिका आणि नाटोचे देश शस्त्रास्त्रे पुरवत असल्याने पडत नाहीय. याचा रशियाला प्रचंड राग असून दोन दिवसांत युक्रेन पाडण्याचे मनसुबे रचणारे पुतीन पुरते घायाळ झाले आहेत. आता युद्ध अशा वळणावर येवून ठेपले आहे की, ते थांबविताही येणार नाही आणि न थांबल्यास तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.
अशातच युक्रेनच्या मदतीसाठी तप्तर असलेल्या पोलंडमध्ये जाण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी घेतला आहे. येत्या २५ मार्चला बायडेन पोलंडची राजधानी वारसॉला जाणार आहेत. युद्धाने धगधगती युक्रेनची सीमा तेथून जवळ आहे. रशियाची सीमा जरी पोलंडला लागून नसली तरी रशियाचा मित्र बेलारुसची सीमा पोलंडला लागून आहे. येथे बायडेन पोलंडचे अध्यक्ष आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. रशियाच्या युक्रेनवरील अन्यायकारक आणि युद्धामुळे मानवतावादी संकट निर्माण झाले आहे, त्याचा सामना कसा करायचा यावर ही चर्चा केली जाणार आहे.
मारियापोल शहर आता रशियन फौजांच्या ताब्यात जाणार आहे. ठिकठिकाणी रशियाचे सैनिक आणि रणगाडे दिसू लागले आहेत. अशातच युक्रेनी सैन्याला ५ वाजेपर्यंत शरणागती पत्करण्याचा इशारा या शहरात देण्यात आला आहे. या शहराची अवस्था अशी झाली आहे की, जवळपास ८० टक्के इमारती नेस्तनाभूत करण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे जगभरातून युक्रेनला मदत केली जात आहे. अमेरिकेने पुन्हा एकदा मोठी मदत जाहीर केली आहे. मोल्दोवाला युक्रेनी शरणार्थींना मदत करण्यासाठी अमेरिका ३० दशलक्ष डॉलर्सची मदत देणार आहे. या देशात बहुतांश युक्रेनी नागरिकांनी शरण घेतली आहे. ऑस्ट्रेलिया युक्रेनमधील वीजनिर्मिती प्लांट सुरु ठेवण्यासाठी 70 हजार टन कोळसा मोफत पुरविणार आहे.