Russia-Ukraine War: युक्रेनच्या खेरसन शहरावर रशियाने मिळवला ताबा, महापौरांनी टेकले गुडघे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 04:09 PM2022-03-03T16:09:48+5:302022-03-03T16:09:59+5:30
Russia Seized Kherson: रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाचा आज आठवा दिवस आहे. आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोकांनी देश सोडून पलायन केले आहे.
कीव: मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण युद्ध(Russia-Ukraine War) सुरू आहे. रशियन सैन्याचे युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले सुरू आहेत. रशिया राजधानी कीव आणि खारकीव ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण अद्याप त्यांना यश आले नाही. दरम्यान, रशियाने युक्रेनमधील खेरसन(Kherson) हे शहर आपल्या ताब्यात मिळवल्याची माहिती समोर आली आहे.
युक्रेनचे मोठे शहर रशियाच्या ताब्यात
रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाचा आज आठवा दिवस आहे. आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोकांनी देश सोडून पलायन केले आहे. सुमारे तीन लाख लोकसंख्या असलेल्या खेरसन शहराने गेल्या वर्षी नाटो-समर्थित युद्ध सरावाचे आयोजन केले होते. अशा स्थितीत हे शहर काबीज करणे म्हणजे रशियासाठी मोठे यश आहे. आता रशियन सैन्य राजधानी कीवकडे कुच करत आहे.
Chilling. Prisoner transport vehicles lining up in Kherson 🇺🇦 after the city was captured by 🇷🇺 after several days of fighting. Darkness descends. An empire of evil has come. pic.twitter.com/wzvlYV4vPy
— Carl Bildt (@carlbildt) March 2, 2022
महापौरांनी गुडघे टेकले
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, रशियाने खेरसनवर पूर्णपणे ताबा मिळवला आहे. तीन दिवसांपासून नाकाबंदी करण्यात आली होती, त्यामुळे अन्नपदार्थ आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. युद्धा आणि अन्य कारणांमुळे रुग्णालयात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठीही संघर्ष करावा लागत आहे. दरम्यान, खेरसनच्या महापौरांनीही रशियन सैन्यासमोर गुडघे टेकल्याची माहिती समोर येत आहे.
रशियन सैन्याशी न लढण्याचे आवाहन
महापौर वदिम बॉयचेन्को यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की त्यांनी रशियन सैन्याला कोणतेही आश्वासन दिले नाही, परंतु कर्फ्यू आणि कार वाहतुकीवर निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर त्यांनी लोकांना रशियन सैनिकांसोबत न लढण्याचा सल्ला दिला आहे. आता रशिया युक्रेनच्या दक्षिणेकडील भागाकडे वेगाने पुढे जात आहे. खेरसेनमध्ये घुसल्यामुळे रशियाला युक्रेनच्या पश्चिम आणि उत्तर भागात पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.