Russia-Ukraine war: युद्धादरम्यान टेन्शन वाढलं, बायडेन यांच्याकडून पुतिन यांचा 'वॉर क्रिमिनल' उल्लेख; रशिया म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 08:27 AM2022-03-17T08:27:57+5:302022-03-17T08:28:22+5:30
Russia-Ukraine war: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा 'वॉर क्रिमिनल' असा उल्लेख केल्यानं रशियानं संताप व्यक्त केला आहे.
Russia-Ukraine war: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान अमेरिकेनं केलेल्या एका वक्तव्यावरून रशियानं संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russia Vladimir Putin) यांच्याविरोधात केलेलं वक्तव्य हे अस्वीकार्य आणि अक्षम्य असल्याचं पुतीन यांचं कार्यालय क्रेमलिननं (Kremlin) म्हटलं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतीन यांना गुन्हेगाराच्या रुपात सांगणं हे अस्वीकार्य आणि अक्षम्य वक्तव्य असल्याचं क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी म्हटलं. रॉयटर्सनं टॅस न्यूज एजन्सीच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलंय.
अमेरिकेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना बायडेन यांनी पुतीन एक युद्धाचे गुन्हेगार असल्याचं वक्तव्य केलं. यापूर्वी अनेकदा युक्रेनवरील हल्ल्यावरून अमेरिकेनं रशियाला इशारा दिला होता. "आम्ही रशियावर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी आणि रशियाला आंतरराष्ट्रीय मंचावर वेगळं पाडण्यासाठी सक्षम आहोत. अमेरिकन पायलट आणि अमेरिकन लष्करी विमानं टँकसहित रवाना होत आहेत," असं यापूर्वी बायडेन म्हणाले होते. तसंच जी-७ देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान, ब्रिटन, अमेरिकेनं रशियावर निर्बंध लादण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं.
स्लोव्हाकिया मदतीसाठी पुढे
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या हल्ल्यादरम्यान, युक्रेनच्या मदतीसाठी आता स्लोव्हाकियाही पुढे आला आहे. स्लोव्हाकिया युक्रेनला सोव्हिएत बनावटीची S-300 मिसाइल सिस्टम देण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे. ही मिसाईल सिस्टम देण्यापूर्वी यावर NATO ची मंजुरी आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं.
याशिवाय आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचं अमेरिकेनं स्वागत केलं आहे. रशियन सरकारनं आंतराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करावा आणि अस्थायी उपाययोजनांचं पालन करण्याचं आवाहन करत असल्याचं युएस डिपार्टमेंट ऑफ स्टेटचे नेड प्राइस यांनी सांगितलं. तसंच आपण युक्रेनसोबत असल्याचेही ते म्हणाले.