Russia Ukraine War: मध्य-पूर्वेतील 'या' देशावर कोसळलं मोठं संकट, भारताकडे मागीतली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 04:44 PM2022-03-19T16:44:23+5:302022-03-19T16:45:24+5:30
लेबनानचे अर्थव्यवस्था आणि व्यापार मंत्री अमीन सलाम यांनी लेबनानमधील भारताचे राजदूत डॉ. सोहेल एजाज खान यांची भेट घेतली आहे...
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेतील अनेक देशांमध्ये मोठे अन्न संकट निर्माण झाले आहे. या भागातील बहुतेक देश रशिया आणि युक्रेनकडून गव्हाची खरेदी करतात. मात्र युद्धामुळे या देशांना गव्हाचा पुरवठा होणे बंद झाले आहे. या भागातील अनेक देश रशिया आणि युक्रेनकडून आवश्यकतेच्या 60 टक्के गव्हाची खरेदी करतात. याच देशांमध्ये लेबनॉनचाही (Lebanon) समावेश आहे. अर्थातच लेबनॉनसमोरही अन्ना-धान्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. यामुळे त्याने भारताकडे मदत मागीतली आहे.
तुर्कीच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लेबनानचे अर्थव्यवस्था आणि व्यापार मंत्री अमीन सलाम यांनी लेबनानमधील भारताचे राजदूत डॉ. सोहेल एजाज खान यांची भेट घेतली आहे. यावेळी लेबनॉनच्या मंत्र्यांनी रशियन हल्ल्यामुळे उद्भवलेल्या अन्न संकटात लेबनानची मदत करावी, असे आवाहन केले आहे.
या बैठकीनंतर, लेबनानच्या अर्थ मंत्रालयाने एक निवेदनही जारी केले. यात, 'सलाम यांनी लेबनानमधील भारताचे राजदूत डॉ. सोहेल एजाज खान यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी भारताच्या राजदूतांनी त्यांना आश्वासन दिले की, भारताकडे गव्हाचा पुरेसा साठा आहे आणि ते आवश्यक प्रमाणात लेबनानला गव्हाचा पुरवठा करतील. युक्रेन संकटानंतर निर्माण झालेल्या अन्न संकटाचा सामना करण्यासंदर्भात चर्चा करणे हा या बैठकीचा उद्देश होता.' भारताशिवाय लेबनान तुर्कीसह इतर देशांसोबतही गेव्हाच्या खरेदीसाठी बोलणी करत आहे.