गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि नाटोवर अवलंबून राहिलेला युक्रेन युद्धाच्या पहिल्या दिवशीच हतबल झाला आहे. अमेरिका आणि नाटोने रशियाला रोखणार असल्याचे आश्वासन युक्रेनला वेळोवेळी दिले होते. परंतू रशियाचे सैन्य युक्रेनमध्ये घुसले, क्षेपणास्त्रे डागली, लढाऊ विमानांनी हवाई हल्ले केले तरी ना अमेरिका मदतीला आली ना नाटो. यामुळे युक्रेन आता भारताला शरण आला आहे.
युक्रेनने आता भारताकडे धाव घेतली आहे. भारतातील युक्रेनचे राजदूत डॉ. इग़र पोलिखा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आता हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. आमच्या देशात हल्ले सुरु झाले आहेत. सीमाभागात युक्रेनच्या चेकपोस्टवर रशिया हल्ले करत आहे. काही हल्ले अगदी राजधानीपर्यंत झाले आहेत. सकाळी पाच वाजता हे हल्ले सुरु झाले. आमच्या सैन्याच्या ठिकाण्यांवर हल्ले झाले आहेत. आम्ही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी शेवटपर्यंत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतू सारे फोल ठरल्याचे पोलिखा यांनी म्हटले.
युक्रेनमधील परिस्थिती अचानक बदलली आहे. आमच्या देशाची आणि नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यास आम्ही तयार आहोत. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता हस्तक्षेप करावा. ते प्रभावशाली नेते आहेत. त्यांनी काहीही करून पुतीन आणि आमचे राष्ट्राध्यक्ष जेनेंस्की यांच्यात चर्चा घडवून आणावी. मोदींनी या प्रकरणी दखल घ्यावी, अशी मागणी पोलिखा यांनी केली आहे.
दुसरीकडे रशियाने युक्रेनचे सैनिक शरणागती पत्करत असल्याचा दावा केला आहे. युक्रेनचे सैनिक आता मागे जाऊ लागले आहेत, असे म्हटले आहे. युक्रेनमध्ये १८ हजार भारतीय अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी पर्यायी मार्ग शोधले जात आहेत. दरम्यान रशियाचे ५० सैनिक मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तसेच रशियाची ५ लढाऊ विमाने आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावाही केला आहे.