रशियाने पहिल्याच दिवशी युक्रेनची राजधानी कीववर आक्रमण करत खळबळ उडवून दिली आहे. युक्रेनच्या सैन्याने ठिकठिकाणी सपशेल शरणागती पत्करली असून रशियन हवाई दलाने युक्रेनचा अत्यंत महत्वाचा असलेला अंतोनोव्ह आंतरराष्ट्रीय विमानतळावर कब्जा केल्याचे वृत्त आहे. या विमानतळापासून राजधानी कीव अवघ्या ३३ किमीवर असून रशियाचे सैन्य कीवच्या सीमेवर धडकले आहे.
रशियन सैन्याने कीवमध्ये घुसण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनच्या सैन्याचा प्रतिकार कमी झाला असून ठिकठिकाणी सैन्याने शरणागती पत्करल्याने रशियाचे सैन्य वेगाने युक्रेनमध्ये घुसले आहे. एवढेच नाही तर युक्रेनच्या चेकपोस्टवर देखील एकही सैनिक प्रतिकारासाठी दिसला नाही. यामुळे युद्धाच्या बारा तासांतच रशियाने युक्रेनच्या निम्म्या भागावर कब्जा केल्याचे दृष्य आहे. युक्रेनच्या २५ हून अधिक शहरांवर रशियाच्या सैन्याने हल्ला केल्याचे युक्रेनने म्हटले आहे.
दुसरीकडे रशियन युद्धनौकांनी समुद्र किनाऱ्यावरील शहरांवर हल्ले चढविण्यास सुरुवात केली आहे. हा भाग युक्रेनच्या दुसऱ्या बाजुला असल्याने तिथपर्यंत रशियने सैन्याला पोहोचण्यास विलंब होणार आहे. परंतू युक्रेनची राजधानी कीव रशियापासून खूप जवळ असल्याने रशियाने रात्रीपर्यंत जर कीववर ताबा मिळविला तर युक्रेन पडल्यात जमा आहे.
अमेरिका आणि नाटो रशियाला केवळ धमक्याच देत राहिले आहेत. नाटोने १०० युद्धनौका हाय अलर्टवर ठेवल्याचे वृत्त आहे. परंतू रशियाने एवढ्या वेगाने आणि ताकदीने आक्रमण केलेय की त्यांनाही पाहत रहावे लागण्यापलिकडे काही राहिलेले नाही. दरम्यान, युक्रेननेही रशियाला प्रत्यूत्तर देण्याचा प्रयत्न केला असून रशियाची सात लढाऊ विमाने पाडली आहेत. तसेच पन्नासहून अधिक सैनिकांना मारले आहे. असे असले तरी देखील रशियाच्या आक्रमणासमोर युक्रेनचा निभाव लागत नाहीय.
नाटो हल्ल्यासाठी तयार...उत्तर अटलांटिक कौन्सिलच्या सर्वसाधारण बैठकीनंतर ब्रुसेल्स (बेल्जियम) येथील NATO च्या मुख्यालयात माध्यामांशी बोलताना स्टोल्टेनबर्ग म्हणाले, आमच्याकडे आमच्या हवाई सीमांचे संरक्षण करण्यासाठी 100 हून अधिक जेट आणि उत्तरेपासून भूमध्य सागरापर्यंत समुद्रात 120 हून अधिक युद्धनौकांचा ताफा आहे. आम्ही आमच्या सहकाऱ्याचा युद्धापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलू.