Russia Ukraine War : "हे पुतिनना दाखवा"; जेव्हा गोळीबारात जखमी झालेल्या चिमुरडीला पाहून डॉक्टरचेही अश्रू झाले अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 07:47 AM2022-02-28T07:47:44+5:302022-02-28T07:54:59+5:30
Russia Ukraine War : रशियानं युक्रेनच्या मारियुपोल शहराकडे बॉम्बचा वर्षाव केला. यामध्ये एक सह वर्षांची मुलगीही जखमी झाली.
Russia Ukraine War : युक्रेनवर रशियाचे हल्ले अद्यापही सुरू आहेत. २४ फेब्रुवारीपासून रशिया सातत्यानं युक्रेनवर हल्ले करतोय. रशियाच्या या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अधिकृतरित्या ३५२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये. यामध्ये १६ मुलांचाही समावेश आहे. रशियानं युक्रेनच्या मारियुपोल शहराकडेही मोठ्या प्रमाणात बॉम्ब टाकले. यामध्ये एक सहा वर्षांची मुलगी जखमी झाली. तिला रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी त्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि रक्तस्त्रावही होत होता. तिच्य़ा वडिलांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
रुग्णालयातील वैद्यकीय टीमनंही तिलसा वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. तिच्या छातीवर पंप करण्यात आलं. तर दुसरीकडे तिच्या आईलाही मुलीची स्थिती पाहून अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही पूर्ण ताकदीनीशी तिला वाचवण्याचे प्रयत्न केले.
डॉक्टरांची एक टीम तिला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न करत होती. अशाच वेळी एका डॉक्टरांना तिची परिस्थिती पाहून अश्रू आणि भावना अनावर झाल्या. "हे पुतिनना दाखला, या मुलीचे डोळे पाहा," असं म्हणत त्या डॉक्टरांच्याही अश्रूंना बांध फुटला. अनेक प्रयत्न करूनही डॉक्टर त्या मुलीला वाचवू शकले नाहीत. उपचारादरम्यान, त्या चिमुरडीनं जगाचा निरोप घेतला.
गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चा केली जाईल, असं रविवारी समोर आलं होतं. रशियानं युक्रेनला चर्चेचा प्रस्ताव दिल्याचं म्हटलं गेलं होतं. तसंच बेलारुसमध्ये येऊन चर्चेचा प्रस्ताव युक्रेनमध्ये ठेवण्यात आला होता. रशियाचा हा प्रस्ताव युक्रेननं धुडकावला. तसंच बेलारुसमध्ये चर्चा केली जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. युक्रेननंही चर्चेसाठी काही शहरांची नावं दिलं. परंतु सध्या दोन्ही देशांमध्ये कोणतीही चर्चा होऊ शकली नाही.