Russia Ukraine War : युक्रेनच्या दोन शहरांमध्ये रशियाकडून तात्पुरता युद्धविराम; नागरिकांना मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 02:25 PM2022-03-05T14:25:14+5:302022-03-05T14:25:31+5:30
Russia Ukraine War Updates : जर आपल्या मागण्या मान्य केल्या तर आपण हल्ले थांबवण्यास तयार असल्याचं पुतीन यांनी यापूर्वी सांगितलं होतं.
Russia Ukraine War Updates : युक्रेनमध्ये रशियन हल्ल्याच्या (Russia Ukrraine War) दहाव्या दिवशी रशियाने तात्पुरता युद्धविराम जाहीर केला आहे. नागरिकांना बाहेर पडण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर उपलब्ध करून देणार असल्याचेही रशियाने म्हटले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या वृत्ताची पुष्टी केली असून स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ ते ४ या वेळेत युद्धविराम घोषित करण्यात आला आहे. यावेळी नागरिकांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी रशिया युक्रेनच्या मारियुपोल आणि वोल्नोवाखा शहरांमध्ये मानवतावादी कॉरिडॉर उपलब्ध करून देणार असल्याचंही म्हटलंय. यावेळी रशिया गोळीबार थांबवेल. रशियाने नागरिकांना शहर सोडण्याचे आवाहन केले आहे.
तर दुसरीकडे रशियावर निर्बंध लादणाऱ्या देशांची संख्याही वाढू लागली आहे. युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता सिंगापूरनेही रशियावर आर्थिक निर्बंध जाहीर केले आहेत. सिंगापूरने रशियन सेंट्रल बँक आणि काही इतर रशियन बँकांवर निर्बंध लादले आहेत. यासोबतच रशियाच्या युक्रेनमधील लष्करी कारवाईमुळे देशातील निर्यातीवरही बंदी घालण्यात आली असल्याची माहिती सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी दिली.
Temporary ceasefire begins in Mariupol and Volnovakha to set up humanitarian corridors. The corridors will serve to evacuate civilians & deliver food & medicine to the cities that have been cut off from the world...: Ukraine's The Kyiv Independent
— ANI (@ANI) March 5, 2022
'मागण्या मान्य करा'
युक्रेनची राजधानी कीव आणि इतर प्रमुख शहरांमध्ये हवाई हल्ल्यांच्या बातम्या हा मोठा अपप्रचार असल्याचे पुतीन यांनी यापूर्वी म्हटले होते. आपल्या मागण्या मान्य झाल्या तरच युक्रेनवर चर्चा शक्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. युक्रेनियन बाजू आणि इतर सर्वांशी चर्चेचा पर्याय रशियासाठी खुला असल्याची पुष्टी पुतीन यांनी केली. मात्र रशियाच्या सर्व मागण्या मान्य केल्या जाण्याची अट असल्याचं क्रेमलिननं म्हटलंय.
यामध्ये प्रामुख्यानं तटस्थ आणि अण्वस्त्र नसलेला देश होणं, त्यांच्याद्वारे क्रिमियाला रशियाचा भाग मानणं आणि पूर्व युक्रेनच्या फुटीरतावादी प्रदेशांचे सार्वभौमत्व यांचा समावेश आहे. युक्रेन सरकार तर्कसंगत आणि सकारात्मक दृष्टीकोन दर्शवेल अशी आशाही यावेळी व्यक्त करण्यात आली.