नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) रशिया-युक्रेन मुद्द्यावर मतदानावेळी भारत सातत्याने गैरहजर राहत आहे. मात्र, आता येणारे काही दिवस अत्यंत आव्हानात्मक असणार आहेत. कारण, संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA), सुरक्षा परिषदेत आणि मानवाधिकार परिषदेमध्ये येणाऱ्या काही दिवसांत एकापाठोपाठ एक, असे अनेक ठराव येणार असून त्यावर मतदान होणार आहे. नुकतेच खार्किव येथे एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यू झाला आहे. यामुळे आता येणाऱ्याकाळात संयुक्त राष्ट्रसंघात भारत काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारत भूमिका बदलणार?खरे तर, भारताच्या भूमिकेत फारसा बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) मानवी मदत अथवा सहकार्यासंदर्भात प्रस्ताव आलाच तर भारत एखादवेळी पर्यायांचा विचार करू शकतो. मात्र, हे सर्व त्या प्रस्तावात वापरण्यात आलेल्या भाषेवरही अवलंबून असेल. प्रस्ताव आणण्याची फ्रान्सची तयारी - फ्रान्स, युक्रेनमध्ये कुठल्याही अडथळ्याशिवाय मानवी मदत पोहोचण्याच्या गॅरंटीसंदर्भातील प्रस्ताव आणण्याची तयारी करत आहे. याशिवाय, फ्रान्स युद्धविराम करण्याचे आवाहनही करत आहे.
रशियन हल्ल्याच्या निषेधाचा प्रस्ताव, भारताची काय असेल भूमिका? आज संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) युक्रेनवरील रशियन हल्ल्याच्या निषेधाचा प्रस्ताव येऊ शकतो. सुरक्षा परिषदेमध्ये एका अशाच ठरावावर मतदानावेळी भारत अनुपस्थित होता. यामुळे भारत आताही आपली पूर्वीची भूमिकाच कायम ठेवू शकतो आणि मतदानापासून दूर राहू शकतो.
एकूण 80 देशांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन तो महासभेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. इतरही अनेक देश या प्रस्तावाच्या बाजूने मतदान करतील, असे मानले जात आहे. असा प्रस्ताव महासभेत 50 टक्के देशांच्या स्वीकृतीने पास होतो. मात्र, रशियाला एकाकी पाडण्यासाठी अमेरिकेसह इतर देश, हा प्रस्ताव पूर्ण बहुमताने पास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात बोलताना, भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला (Harsh Shringla) म्हणाले, 'यावर आम्ही सावधपणे विचार करूनच निर्णय घेऊ. तसेच भारताच्या हिताच्या दृष्टीनेच यावर विचार केला जाईल,' असेही ते म्हणाले.