मॉस्को - गेल्या दोन महिन्यांपासून रशियाकडून युक्रेनवर भीषण हल्ले सुरू आहेत. या युद्धामुळे युक्रेनमधील अनेक प्रमुख शहरे बेचिराख झाली आहेत. मात्र या युद्धात रशियाचेही फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, या युद्धादरम्यान, एक धक्कादायक बातमी आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोईगू हे गेल्या काही दिवसांपासून दिसत नाही आहेत. युक्रेनमध्ये होत असलेल्या नुकसानामुळे व्लादिमीर पुतीन आणि सर्गेई शोईगू यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला.
रशियन टाइम्सच्या रिपोर्टनुसार रशियन-इस्राइली व्यावसायिक लियोनिद नेवजलिन यांनी दावा केला की, संरक्षणमंत्री आणि पुतीन यांचे निकटवर्तीय असलेल्या सर्गेई शोइगू यांना हृदयविकाराचा धक्का हा प्रकृतीच्या कारणांमुळे पडलेला नाही. त्यामुळे २० जनरलनां संशयाच्या आधारावर अटक करण्यात आली आहे. शोइगू यांना हृदयविकाराचा धक्का हा काही चुकीच्या कारणांमुळे म्हणजेच काही गडबडीमुळे आला आहे.
शोईगू हे २०१२ पासून पुतीन यांचे निकटवर्तीय आहेत. मात्र ते गेल्या काही आठवड्यांपासून बेपत्ता होते. लियोनिद यांनी शोईगू यांच्याबाबत केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. हा दावा खरा असेल तर त्यामुळे जागतिक राजकारणात एकाकी पडलेले रशियाचे राष्ट्रपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये तीव्र मतभेद असल्याचा चर्चांवर शिक्कामोर्तब होईल.
नेवजलीन यांनी शोईगू यांच्या हार्ट अॅटॅकबाबत शंका व्यक्त केली. ते म्हणाले की, हे नैसर्गिक कारणांमुळे होऊ शकत नाही. त्यांच्या हत्येचा प्रयत्न झालेला असू शकतो. शोईगू काल आर्क्टिकच्या विकासासंदर्भात झालेल्या एका व्हिडीओ कॉन्फ्रन्समध्ये पाहिले गेले होते. मात्र त्यांनी या कॉन्फ्रन्समध्ये काहीही चर्चा केली नाही. दरम्यान, हा व्हिडीओ आधी रेकॉर्डेड असावा आणि लोकांना भ्रमित करण्यासाठी ते चित्रण वापरले गेले, असावे, अशी चर्चा आहे.