Russia-Ukraine War: रशियाच्या अर्थव्यवस्थेवर आणखी एक 'वार', मास्टरकार्ड-व्हिसाने बंद केली सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 11:05 AM2022-03-06T11:05:57+5:302022-03-06T14:07:53+5:30
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून अनेक देशांनी आणि विविध संस्थांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत.
मॉस्को: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून अनेक देशांनी आणि विविध संस्थांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. यातच आता मास्टरकार्ड आणि व्हिसानेही मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही कंपन्या रशियामधील त्यांच्या सेवा बंद करत आहेत. मास्टरकार्डने शनिवारी सांगितले की, त्यांचे नेटवर्क यापुढे रशियन बँकांकडून जारी केलेली कार्डे स्वीकारणार नाही. तसेच, इतर कोणत्याही देशात जारी केलेले कार्ड रशियन स्टोअर किंवा एटीएममध्ये काम करणार नाही.
मास्टरकार्डने निवेदनात काय म्हटले?
मास्टरकार्डचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एल केली यांनी एका निवेदनात म्हटले की, ''आम्ही हा निर्णय घाईने घेतलेला नाही. ग्राहक, भागीदार आणि सरकार यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. रशियाच्या या कृत्यामुळे आम्हाला ही कृती करण्यास भाग पाडले गेले आहे."
व्हिसाने आपल्या निवेदनात काय म्हटले ?
शनिवारी जारी केलेल्या निवेदनात व्हिसाने म्हटले की, ''युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे ते रशियातील त्यांची सेवा तत्काळ प्रभावाने निलंबित करत आहेत. रशियामध्ये जारी केलेल्या व्हिसा कार्डांसह सुरू केलेले सर्व व्यवहार यापुढे देशाबाहेर चालणार नाहीत. रशियामधील ग्राहक त्यांच्या देशात कार्डद्वारे पेमेंट करू शकतील, परंतु कंपनी व्यवहार प्रक्रिया राबणार नाही. हा व्यवहार रशियाच्या नॅशनल पेमेंट कार्ड सिस्टम किंवा NSPK अंतर्गत असेल.''
युक्रेनियन लोकांसाठी फॅमिली व्हिसा योजना सुरू
रशियावरील सततच्या निर्बंधांदरम्यान, यूकेच्या गृहसचिव प्रिती पटेल यांनी शुक्रवारी युक्रेनियन नागरिकांसाठी सरकारने आधीच जाहीर केलेली फॅमिली व्हिसा योजना औपचारिकपणे सुरू केली. या योजनेंतर्गत, युक्रेनियन वंशाचे ब्रिटिश नागरिक आणि ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले युक्रेनियन नागरिक रशियासोबतच्या संघर्षामुळे प्रभावित झालेल्या युक्रेनियन नातेवाईकांना कोणतेही व्हिसा शुल्क न भरता यूकेमध्ये आणू शकतील.