Russia Ukraine War : ...तर मिसाईल हल्ल्यात मारलं गेलं असतं संपूर्ण युक्रेनियन कुटुंब, टॅक्सीनं जीव वाचवला!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 02:02 PM2022-04-10T14:02:52+5:302022-04-10T14:04:13+5:30
या हल्ल्यात किमान 52 लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर शंभरहून अधिक लोक जखमी झाल्याचे बोलले जात आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. पूर्व युक्रेनमधील रामतोर्स्क शहरातील एका सबवे स्टेशनवर रशियाने शुक्रवारी मिसाईल हल्ला केला. यानंतर, आता या हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रतिक्रिया देत आहेत. यातीलच एक असलेल्या सिडोरेंको कुटुंबातील सदस्यांनी सांगितले, की या हल्ल्यात मारल्या गेलेल्या अथवा जखमी झालेल्या कोलांमध्ये कदाचित आमचाही समावेश असला असता. मात्र, आम्ही पहिल्यांदा बुक केलेली टॅक्सी आली नाही. यामुळे आम्हाला दुसऱ्या टॅक्सीने यावे लागले. परिणामी आम्ही स्टेशनवर उशिरा पोहोचलो आणि या हल्ल्यातून बचावलो.
या कुटुंबातील सदस्य असलेल्या इव्हान सिडोरेन्को यांनी सांगितले की, "आम्हाला शुक्रवारी सकाळी 11 वाजता लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी चालवली जाणारी ट्रेन पकडायची होती. पण ज्या टॅक्सीने स्टेशनपर्यंत पोहोचायचे होते ती आलीच नाही. यामुळे दुसऱ्या टॅक्सीने स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला वेळ लागला. यामुळे आम्ही हल्ल्यातून वाचलो." या हल्ल्यात किमान 52 लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर शंभरहून अधिक लोक जखमी झाल्याचे बोलले जात आहे.
इव्हान म्हणाले, आपले कुटुंब स्टेशनवर पोहोचण्याच्या केवळ तीन मिनिटे आधीच हा स्फोट झाला होता. जेव्हा क्षेपणास्त्र सबवे स्टेशनवर पडले, तेव्हा तेथे किमान दोन हजार लोक उपस्थित होते. घटनास्थळी जळत्या गाड्या, मिसाईलचे जळणारे तुकडे आणि जीव वाचविण्यासाठी सैरवैर धावणारे लोक दिसत होते, असेही ते म्हणाले.
मात्र रशियाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. तसेच, हा हल्ला युक्रेनच्या सैनिकांनीच केला आणि आता ते रशियाला जबाबदार धरत आहे, असा आरोप मॉस्कोने केला आहे.