मॉस्को : आमचे सरकार युक्रेनच्या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार आहे, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी सांगितले. यासंदर्भात चीन दौऱ्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत व्लादिमीर पुतिन यांनी भाष्य केले. त्यामुळे ८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येणार असल्याची चर्चा आहे.
जोपर्यंत इतर देश आपले हित लक्षात ठेवतील तोपर्यंत रशिया चर्चेसाठी तयार आहे, असे व्लादिमीर पुतिन यांनी चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. आम्ही युक्रेनवर चर्चेसाठी तयार आहोत, परंतु अशा चर्चेत संघर्षात गुंतलेल्या सर्व देशांचे हित लक्षात घ्यावे लागेल, असे व्लादिमीर पुतिन म्हणाले. दरम्यान. रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर हल्ला केला होता.
खार्किवमध्ये परिस्थिती बिघडली, झेलेन्स्कींचे परदेश दौरे रद्द दुसरीकडे, खार्किव प्रदेशात रशियाच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आगामी काळात सर्व विदेश दौरे रद्द केले आहेत. त्यांचे प्रवक्ते सेर्ही नायकिफोरोव्ह यांनी बुधवारी ही माहिती दिली. झेलेन्स्की या आठवड्याच्या शेवटी स्पेन आणि पोर्तुगालला भेट देणार होते. रशियाने गेल्या आठवड्यात युक्रेनचे उत्तर-पूर्वेतील दुसरे शहर खार्किव आणि आसपासच्या भागावर हल्ला सुरु केला.
विश्लेषकांनी हा हल्ला कीवसाठी युद्धातील सर्वात धोकादायक असल्याचे म्हटले आहे. मॉस्कोच्या सैन्याने या भागातील अनेक गावे ताब्यात घेतली आहेत. रशियन क्षेपणास्त्रे खार्किववर बॉम्बफेक करत आहेत. खार्किव ताब्यात घेण्यासाठी रशिया शक्यतो शहरावर हल्ले सुरू करत आहे. शस्त्रे, दारूगोळा आणि सैनिकांच्या तुटवड्याचा सामना करत असलेल्या कीवमधील लष्करी नेतृत्वाने खार्किवमधून काही सैनिकांना माघारी नेले जात असल्याचे सांगितले होते.