Russia-Ukraine War: नरेंद्र मोदी युक्रेन-रशिया युद्ध थांबवू शकतात; मेक्सिकोचा संयुक्त राष्ट्रांत प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 07:48 PM2022-09-23T19:48:57+5:302022-09-23T19:49:32+5:30
समरकंद येथे 22 व्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीच्या निमित्ताने मोदी आणि पुतीन भेटले होते. यावेळी मोदींनी पुतीन यांना आजचे युग युद्धाचे नाही, असे समजावले होते. याचे जगाने स्वागत केले होते.
युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरु असल्याच्या घटनेला आता सात महिने झाले आहेत. युक्रेनचा काहीच भूभाग हाती आल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन नाराज आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच अण्वस्त्रांच्या वापराचे संकेत दिले होते. यामुळे अवघ्या जगाच्या चिंता वाढल्या आहेत. असे असताना युएनमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठा विश्वास दाखविण्यात आला आहे.
रशिया-युक्रेनमधील युद्ध रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मेक्सिकोने दिला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर मध्यस्थीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पोप फ्रांसिस आणि संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांची निवड करावी असे यात म्हटले आहे. हा प्रस्तव न्यूयॉर्कमधील युक्रेनवरील संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील चर्चासत्रावर ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो लुइस एब्रार्ड कैसाबोन यांनी ठेवला आहे.
यावेळी त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन-रशियाचे युद्ध थांबवू शकतात, असे म्हटले आहे. मेक्सिको आपल्या शांततेच्या भूमिकेवरून असे सांगत आहे की, आंतरराष्ट्रीय समुदायाने आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व ताकदीनिशी प्रयत्न करायला हवेत. मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांचा प्रस्ताव मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. यासाठी एक समिती स्थापन करावी, त्यात शक्य झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना, पोप फ्रान्सिस आणि गुटेरेस यांना घ्यावे, असे ते म्हणाले.
ही वेळ युद्धाची नाही तर शांततेसाठी काम करण्याची आणि शांततेसाठी वचनबद्ध होण्याची आहे. संवाद, मुत्सद्देगिरी आणि प्रभावी राजकीय व्यक्तींचा वापर करून शांतता मिळविली जाऊ शकते. शांततेकडे गांभीर्याने पाहण्याची हीच योग्य वेळ आहे, असे कैसाबोन म्हणाले.
उझबेकिस्तानमधील समरकंद येथे 22 व्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीच्या निमित्ताने मोदी आणि पुतीन भेटले होते. यावेळी मोदींनी पुतीन यांना आजचे युग युद्धाचे नाही, असे समजावले होते. याचे जगाने स्वागत केले होते.