यूक्रेन-रशिया यांच्यातील युद्धाला महिना उलटत आला तरीही अद्याप युद्ध संपुष्टात आले नाही. या युद्धामुळे अमेरिकेसह नाटो देशांनी हालचाली वाढवल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन(Joe Biden) यांनी ३ बॅक टू बॅक आपत्कालीन बैठका केल्या आहेत. रशियासाठी आगामी काळात हे वाईट संकट असल्यासारखं दिसून येते. NATO नं रशियाच्या बॉर्डरवर अभ्यास सराव वाढवला आहे. रशियाच्या आसपास त्यांच्या सैन्याची संख्या वाढवली आहे. त्यामुळे काहीतरी मोठं घडणार असल्याची शक्यता आहे.
NATO नेत्यांनी गुरुवारी ब्रसेल्स इथं बैठक आयोजित केली. या सर्व देशांनी एकमताने निर्णय घेतलाय की, रशियाविरोधात यूक्रेनला आवश्यक ती मदत करणं, शस्त्रसाठा पुरवणे यापुढेही कायम ठेवले जाईल. इतकेच नाही तर नाटो देशांनी बाल्टिकच्या समुद्रापासून ब्लॅक समुद्रापर्यंत ८ युद्ध नौका तैनात ठेवण्याची तयारी केली आहे. या बैठकीत अमेरिकेचे(America) राष्ट्रपती आणि जगातील ३० देशांच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. पुतिन यांच्यावर NATO चे ३० देश, जी ७ आणि युरोपियन यूनियनचे २७ देशांनी मिळून दबाव निर्माण केला आहे. NATO रशियाबाबत धोका पत्करू शकत नाही. ते सैन्य तैनात करून आपल्या देशांवरील होणाऱ्या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याची तयारीत आहेत.
NATO‘या’ ठिकाणी लढाऊ सैन्य तैनात करेल
नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉलेनबर्ग यांनी पूर्वेकडील सीमेवर आपल्या लष्कर, नौदल आणि वायू सेनेच्या जवानांची संख्या वाढविण्यास कोणीही आक्षेप घेणार नाही, अशी आशा व्यक्त केली आहे. पहिल्या टप्प्यात नाटोचे चार लढाऊ सैन्य बल्गेरिया, रोमानिया, हंगेरी, स्लोव्हाकिया येथे पाठवले जातील.
रशियाची अण्वस्त्र हल्ल्याची धमकी
दुसरीकडे, नाटोच्या प्रत्येक पावलावरून रशियाचा संताप पुढे येत आहे. NATO नं चिथावणी दिल्यास पुतिन अण्वस्त्र हल्ला करू शकतात, असे अमेरिकेतील रशियाचे उपराजदूत दिमित्री पोलान्स्की यांनी म्हटले होते. याआधी क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करण्याबाबत बोलले होते. २४ तासांत रशियाकडून युक्रेनवर अण्वस्त्र हल्ल्याच्या दोन धमक्या आल्या आहेत. नाटोने रशियाला चिथावणी दिली तर आम्हाला अण्वस्त्रे वापरण्याचा अधिकार आहे असे दिमित्री पोलिंस्की यांनी म्हटलं आहे.
रशियाकडे सर्वाधिक अण्वस्त्रे
एक दिवस अगोदर बुधवारी क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी युक्रेनवर बोलताना अण्वस्त्र हल्ल्याबाबत सांगितले. जर रशियाला "अस्तित्वाचा धोका" असेल तर तो अण्वस्त्रांचा वापर करेल, असे त्यांनी म्हटले होते. इतकेच नाही तर जगात सर्वात जास्त अण्वस्त्र रशियाकडे आहे याचीही आठवण करून देत त्यांनी इशारा दिला.