वॉशिंग्टन - रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह अनेक देश रशियाविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यादरम्यान आता रशियाबाबत नाटोचे प्रमुख जेन्स स्टोलटेनबर्ग यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांचे समकक्ष रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या सहकारी देशांच्या संरक्षणासाठी लष्कराच्या तैनातीवर सहमत झाले आहे.
जेन्स स्टोलेनबर्ग यांनी सांगितले की, नेत्यांनी नाटोच्या सैन्याच्या त्वरित तैनात होणाऱ्या तुकड्या पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र किती सैनिकांची तैनाती होणार आहे, हे त्यांनी सांगितलेले नाही. मात्र या सैनिकांमध्ये लष्कर, हवाई दल आणि नौदल यांचा समावेश असेल असे त्यांनी सांगितले. रशियाने रोमानियामध्ये जहाजावर हल्ला केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात येत आहे. रोमानिया हा नाटोचा सदस्य आहे.
स्टोलटेनबर्ग यांनी सांगितले की, रशियाचे आक्रमण हे केवळ युक्रेनपुरते मर्यादित नाही आहे. अशा परिस्थितीत सहकारी देशांमध्ये जमीन, समुद्र आणि आकाशात नाटो रिस्पॉन्स फोर्सची तुकडी तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्टोलटेनबर्ग पुढे म्हणाले की, रशियाच लक्ष्य हे युक्रेनच्या सरकारला बदलण्याचे आहे. मी युक्रेनच्या सशस्र दलांबाबत आपला सन्मान व्यक्त करतो. ते आक्रमक रशियन सैन्याविरोधात लढून आणि त्यांच्याविरोधात उभे राहून आपली बहादुरी आणि साहसाचा प्रत्यय देत आहेत.