रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा बारावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत रशियाने युक्रेनवर एकूण ६०० मिसाईल हल्ले केल्याचा दावा युक्रेनच्या मीडियाने केला आहे. तसेच रशियाने आपले जवळपास ९५ टक्के सैन्य युक्रेनमध्ये तैनात केले आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून अनेक देशांनी आणि विविध संस्थांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. यातच आता न्यूझीलंडने (New Zeland) एक मोठा निर्णय घेतला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासह १०० महत्त्वाच्या व्यक्तींवर बंदी घातली आहे. या यादीत रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्टिन, संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांचाही समावेश आहे.
रशियाकडून युक्रेनवर मिसाईलचा मारा करण्यात येत आहे. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या खार्किव शहरावर मिसाईल डागले आहेत. या हल्ल्यात शहरातील अनेक रहिवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या युद्धात युक्रेनची मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान गेल्या अकरा दिवसांमध्ये रशियाने अकरा हजार सैनिक मारल्याचा दावा युक्रेनच्या वतीने करण्यात आल आहे.
दक्षिण कोरिया व्यवहार थांबवणार-
रशियाविरुद्ध अतिरिक्त निर्बंधांचा एक भाग म्हणून रशियाच्या मध्यवर्ती बँकेसोबतचे व्यवहार निलंबित करण्यात दक्षिण कोरिया युनायटेड स्टेट्स आणि इतरांमध्ये सामील होईल, असे देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले. संबंधित सरकारी एजन्सींशी सल्लामसलत केल्यानंतर मंजुरीचे अधिक तपशील जाहीर करणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. यापूर्वी, दक्षिण कोरियाने सात प्रमुख रशियन बँकांसह आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली होती.
नेटफ्लिक्सने रशियातील सेवा थांबवली-
Netflix Inc ने रशियातील आपली सेवा निलंबित केली आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने रविवारी सांगितले. या आठवड्याच्या सुरुवातीला, नेटफ्लिक्सने रशियामधील भविष्यातील सर्व प्रकल्प तात्पुरते थांबवले होते. परंतु आता त्यांनी सेवा निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे, यासंदर्भात रॉयटर्सने वृत्त दिलं आहे.