Russia Ukraine War News: युक्रेनची राजधानी कीव येथील परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिघडत असून तेथील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची अॅडवायझरी भारतीय दूतावासाकडून जारी करण्यात आली आहे. भारतीय नागरीक आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत तातडीनं कीव शहर आजच्या आज सोडून जावं अशा सूचना दूतावासाकडून देण्यात आल्या आहेत. ज्या मिळेल त्या माध्यमातून कीव शहर सोडण्याचं आवाहन भारतीय दूतावासाकडून भारतीय नागरीकांना करण्यात आलं आहे. भारतीय दूतावासानं जारी केलेल्या याच अॅडवायझरीवरुन तेथील परिस्थितीचा अंदाज लावता येऊ शकेल.
युक्रेनच्या राजधानी कीवमध्ये भारतीय दूतावास आहे. ट्रेन, मेट्रो किंवा जे मिळेल ते माध्यम वापरुन भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी आजच्या आज कीव शहर सोडावं अशा सूचना भारतीय दूतावासाकडून जारी करण्यात आल्या आहेत.
रशियन सैन्याचं वेगानं कीवच्या दिशेनं आक्रमणरशियन सैन्य आता अधिक तीव्रतेनं राजधानी कीवच्या दिशेनं येत असून रशियाकडून सैन्य वाढविण्यात आलं आहे. कीवमध्ये ठिकठिकाणी हवाई हल्ले होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. रशियाचा तब्बल ६४ किमी लांब असा सैन्यफौजफाटा कीवच्या दिशेनं येत आहे. रशियानं युद्ध पुकारल्यानंतर युक्रेनच्या दिशेनं पाठविण्यात आलेला हा आजवरचा सर्वात मोठा सैन्यफौजफाटा आहे.
युक्रेनमध्ये भारताचे जवळपास २० हजार नागरिक आणि विद्यार्थी अडकून पडले आहेत. आतापर्यंत यातील ४ हजार जणांना सुखरूप मायदेशात आणण्याचं काम पूर्ण झालं आहे. तसंच भारत सरकारच्यावतीनं भारतीय नागरीक व विद्यार्थ्यांच्या बचावासाठी 'ऑपरेशन गंगा' राबविण्यात येत असून काल आठवी फ्लाइट बुडापेस्टहून दिल्ली येथे पोहोचली आहे. तसंच आज सकाळी युक्रेनहून १८२ भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एक फ्लाइट मुंबईत लँड झालं आहे.