कीव: रशियाने पहिल्याच दिवशी जोरदार आक्रमण केल्याने युक्रेनच्या सैन्याला तेवढा प्रतिकार करता आला नव्हता. परंतू आता युक्रेनचे सैन्य जिकीरीने लढा देत असून राजधानी कीव ताब्यात ठेवण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत. अमेरिकेने ऐनवेळी हात वर केल्याने युक्रेन एकाकी पडला आहे. अशातच अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना कीव सोडण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी हवी ती सोय करण्याचा शब्दही दिला आहे. परंतू झेलेन्स्की यांनी अमेरिकेची ऑफर ठोकरली आहे.
झेलेन्स्की यांनी कीवमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. माझ्या देशात युद्ध सुरु आहे. सैनिक, नागरिक प्राणाची बाजी लावून लढत आहेत. अशावेळी आम्हाला शस्त्रांची, दारुगोळ्याची गरज आहे. पळून जाण्यासाठी गाड्यांची नाही, अशा शब्दांत झेलेन्स्की यांनी अमेरिकेला निरोप पाठविला आहे.
रशियाचे सैन्य कीवमध्ये घुसल्याचे समजल्यावर झेलेन्स्की भूमीगत झाल्याचे वृत्त आले होते. परंतू झेलेन्स्की यांनी आज ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत ते कीवमध्येच खुलेआम सैन्यासोबत फिरत असल्याचे व बैठका घेत असल्याचे जाहीर केले. ते कीवच्या रस्त्यांवर दिसत आहेत. तसेच झेलेन्स्की यांनी रशियाला पुन्हा एकदा चर्चेसाठी टेबलवर येण्याचे आवाहन केले आहे.
झेलेन्स्की यांनी शुक्रवारी सांगितले की लष्करी कारवाईत किमान 137 युक्रेनियन ठार झाले आणि 316 हून अधिक जखमी झाले. युक्रेनच्या सैन्याने दावा केला आहे की त्यांनी कीवमध्ये 60 रशियन सैनिकांना ठार केले आहे.