रशियाने युक्रेनवर हल्ला केलेल्याला आता २८ दिवस झाले आहेत. रशियाचे शस्त्रागार रिते होऊ लागले तरी युक्रेन काही केल्या ताब्यात येत नाहीय. चीनने रशियाला शस्त्रास्त्रे पुरविण्याचा शब्द दिला आहे. अशातच रशियन सीमेवरील रडारवर अज्ञात लढाऊ विमाने ट्रेस झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जगातील एक महाशक्ती युद्धात उडी घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे आजपासून चार दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. यावेळी ते युक्रेनला मदतीसाठी अत्यंत मोक्याचा देश असलेल्या पोलंडमध्ये येणार आहेत. रशियापासून पोलंडची राजधानी खूप जवळ आहे. अशावेळी नाटोच्या सैन्याने रशियाच्या सीमेवर युद्धसराव सुरु केल्याने खळबळ उडाली आहे. थोडे थोडके नव्हे तर ३० देशांचे सुमारे तीस हजार सैनिक या युद्धसरावामध्ये उतरले आहेत. यामध्ये अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्या युद्धनौकाही आहेत.
बायडेन युक्रेनवरील युद्धसंकटावर नाटोच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. यानंतर पुढील दिशा ठरविली जाणार आहे. रशियाने आता युद्धाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. व्हॅक्यूम ब़ॉम्ब, फॉस्फरस बॉम्बदेखील वापरण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनी नागरिकांच्या घरांवर देखील मिसाईल हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अनेक शहरांचे खंडर बनविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मानवतेच्या सर्व मर्यादा रशियाने पार केल्याचा आरोप युक्रेनने लावला आहे. या साऱ्या घडामोडींवर युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होणार असल्याचे इशारे दिले आहेत.
रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर गेल्या काही दिवसांत लढाऊ विमाने ट्रेस करण्यात आली आहेत. ही विमाने दोन्ही देशांची नव्हती. या विमानांवर खतरनाक मिसाईल लादलेली होती. महत्वाचे म्हणजे ही विमाने कोणती होती, याची माहिती देखील जगाला देण्यात आलेली नाही. हंगेरीच्या हवाई हद्दीत ही विमाने गेली तरी देखील ती गुप्त ठेवण्यात आली आहे. रडारवर दिसलेली ती विमाने अमेरिकेची की कीव्हच्या भूताची ते देखील स्पष्ट होत नाहीय.