Russia Ukraine War: युद्धाला रशियातूनच विरोध? शेवटच्या प्रसारणात ‘No To War’ म्हणत टीव्ही चॅनेलच्या संपूर्ण स्टाफने दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 06:47 PM2022-03-04T18:47:58+5:302022-03-04T18:48:31+5:30
Russia Ukraine War: युक्रेनविरोधात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पुकारलेल्या युद्धाला आता रशियामधूनच विरोध होत असल्याचे चित्र आहे. एका रशियन टेलिव्हिजन चॅनेलच्या संपूर्ण स्टाफने आपल्या अंतिम प्रसारणामध्ये नो टू वॉर (No To War) असा संदेश देऊन ऑन एअर राजीनामा दिला.
मॉस्को - युक्रेनविरोधात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पुकारलेल्या युद्धाला आता रशियामधूनच विरोध होत असल्याचे चित्र आहे. एका रशियन टेलिव्हिजन चॅनेलच्या संपूर्ण स्टाफने आपल्या अंतिम प्रसारणामध्ये नो टू वॉर (No To War) असा संदेश देऊन ऑन एअर राजीनामा दिला. रशियन अधिकाऱ्यांनी युक्रेनविरुद्धच्या युद्धाच्या प्रसारणासाठी टीव्ही रेनचे प्रसारण निलंबित केले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी लाईव्ह येत सामूहिक राजीनामा दिला.
टीव्ही रेनच्या संस्थापकांमधील एक असलेल्या नतालिया सिंदेयेव्हा यांनी आपल्या अखेरच्या प्रसारणात नो टू वॉर, असे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर चॅनलमधील सर्व कर्मचाऱ्य़ांनी वॉकआऊट केले. त्यानंतर प्रसिद्ध केलेल्या पत्रकात टीव्ही रेनने सांगितले की, त्यांनी आपले प्रसारण अनिश्चित काळासाठी थांबवले आहे.
संपूर्ण स्टाफ स्टुडियोतून बाहेर पडल्यावर टीव्ही रेन चॅनेलने स्वान लेक बॅलेट व्हिडिओ प्रसारित केला. हा व्हिडीओ १९९१ मध्ये सोव्हिएट युनियनच्या पतनानंतर रशियातील सरकारी टीव्ही चॅनेलवर प्रसारित करण्यात आला होता. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.