Russia Ukraine War: 'युक्रेन सरकार उखडून फेकून देणं हा आमचा उद्देश नाही', युद्धाच्या १४ व्या दिवशी पुतीन नरमले!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 04:36 PM2022-03-09T16:36:33+5:302022-03-09T16:36:59+5:30
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज १४ वा दिवस आहे. महत्वाची बाब अशी की दोन्ही देशांच्या नेतृत्त्वानं आता नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज १४ वा दिवस आहे. महत्वाची बाब अशी की दोन्ही देशांच्या नेतृत्त्वानं आता नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. याच संदर्भात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं अत्यंत महत्वाचं विधान समोर आलं आहे. युक्रेन सरकार हटवण्याचा कोणताही इरादा नसल्याचं पुतीन यांनी स्पष्ट केलं आहे. युक्रेन सरकार उखडून फेकून द्यावं असा आमचा उद्देश नाही, असं पुतीन यांनी म्हटलं आहे.
युक्रेनसोबतची चर्चा आता पुढच्या टप्प्यात पोहोचली असल्याचंही याआधी रशियाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. आता नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे याची माहीत अद्याप समोर आलेली नाही. पण सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात दोन्ही देशांच्या नेतृत्त्वाकडून अशी नरमाईची भूमिका घेण्यात आल्यानं मोठी अपडेट मानली जात आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनीही नाटोमध्ये सामील होण्याची आता इच्छा राहिलेली नाही, असं म्हणत नाटो सदस्य देशांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रशियन सैन्य कीव्हच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेलं असतानाही नाटो सदस्य देशांकडून कोणतंही ठोस लष्करी सहाय्य न मिळाल्यानं जेलेन्स्की नाराज झाले आहेत. नाटो सहकार्य करत नसल्यानं आता यात समाविष्ट होण्याची इच्छा राहिलेली नाही, असं जेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. दोन्ही नेत्यांनी नरमाईची भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्ष रणभूमीवर मात्र अद्याप कोणतीही प्रगती झालेली पाहायला मिळत नाही. रशियाकडून युक्रेनवर सुरू असलेले हल्ले अद्यापही कायम सुरू आहेत.