Russia Ukraine War: नरेंद्र मोदी आणि वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्यात आज दुसऱ्यांदा चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 09:24 AM2022-03-07T09:24:47+5:302022-03-07T09:45:18+5:30
Russia Ukraine War: रशियाने युक्रेनमधील निवासी भागांवर हल्ले तीव्र केले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार आहेत.
नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine War) आज 12वा दिवस आहे. जागतिक दबाव आणि सर्व कठोर निर्बंध असूनही, रशियाचे हल्ले तीव्र होत आहेत. रशिया सातत्याने युक्रेनमधील रहिवासी भागांना लक्ष्य करत आहे. त्यामुळे जगभरातील देशांना आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुन्हा एकदा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांच्याशी फोनवर चर्चा करणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
PM Narendra Modi to speak to Ukrainian President Zelenskyy on the phone today: GoI sources
— ANI (@ANI) March 7, 2022
(file photos) pic.twitter.com/PuWuCv2Fqw
रशियाचे हल्ले सुरू असल्याचा युक्रेनचा आरोप
युक्रेनमध्ये रविवारी मारियुपोल येथील दुसरा युद्धविरामदेखील अयशस्वी ठरला. शहरात रशियाने हल्ले सुरू ठेवल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. काल रशियाने खारकीव्ह व अन्य शहरांवरही जोरदार हल्ले चढवले. या माऱ्याच्या तीव्रतेमुळे युक्रेनमधील गॅस यंत्रणेची 16 गॅस पुरवठा केंद्रे बंद करण्यात आली. कनिव येथील जलविद्युत निर्मिती केंद्रावर कब्जा करण्यावर रशियाने आता लक्ष केंद्रित केले आहे.
‘ऑपरेशन गंगा’ अंतिम टप्प्यात
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी राबविण्यात येत असलेले ‘ऑपरेशन गंगा’ अंतिम टप्प्यात आहे. युक्रेनमधून आतापर्यंत 16 हजाराहून अधिक भारतीय परतले आहेत. आज 8 विमाने पाठविण्यात आले असून, 1500 भारतीयांना परत आणण्यात येणार आहे. रविवारी 11 विमानांमधून 2135 भारतीय परतले.