रशिया आणि युक्रेनमध्ये आज तेराव्या दिवशी देखील युद्ध सुरु आहे. हे युद्ध कोणत्याही निर्णायक वळणावर आलेले नाही. कारण युक्रेनचे सैन्या आणि नागरिक एवढ्या त्वेषाने लढत आहेत की रशियन फौजांना नाकीनऊ आले आहे. कीववर रशियाने जोरदार हल्ले चढविले आहेत. यामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की बेपत्ता झाल्याचे, पलायन केल्याचा दावा रशियाने केला होता. यावर जेलेन्स्कींनी आपला ठावठिकाणाच उघड केला आहे.
जेलेन्स्कीं एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी ते कोणत्याही बंकरमध्ये लपलेले नाहीत, तर कीवमध्येच आहेत. आणि देशभक्तीने भारलेले हे युद्ध जिंकण्यासाठी मी कीव्हमध्येच राहिलेले हिताचे असल्याचे ते म्हणाले. मी मैदान सोडणार नाही. सोमवारचा दिवस माझ्यासाठी नेहमीच कठीण असतो. आपल्या देशात युद्ध सुरू आहे. त्यामुळे आमच्यासाठी प्रत्येक दिवस आता सोमवार आहे. तो म्हणाला की मी येथे कीवमधील बारकोवा गल्लीमध्ये आहे. मी कोणाला घाबरत नाही, असे म्हणत त्यांनी रशियन फौजांना ललकारताना आपल्या सैन्याला आणि नागरिकांनाही विश्वास दिला आहे.
रशियाला देव माफ करणार नाही. आज नाही, उद्या नाही, कधीच नाही आणि माफीऐवजी न्याय होईल. हल्लेखोराचा धाडसीपणा हा पश्चिमेच्या देशांना स्पष्ट संकेत आहे की रशियाविरुद्ध निर्बंध पुरेसे नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
13व्या दिवसाच्या युद्धादरम्यान युक्रेनकडून मोठा दावा करण्यात आला आहे. युक्रेनच्या लष्करी गुप्तचरांनी खार्किवमध्ये एका रशियन जनरलची हत्या केल्याचे म्हटले आहे. मेजर जनरल विटाली गेरासिमोव्ह असे त्यांचे नाव आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या मेजर जनरलने रशियाच्या बाजूने क्रिमिया, चेचेन आणि सीरियाच्या लढाईत भाग घेतला होता. मात्र रशियाकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.