Russia-Ukraine War: “...तर भारत-पाक सीमेसारखी अवस्था करू”; रशिया समर्थक ग्रुपची युक्रेनला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 10:54 AM2022-04-07T10:54:34+5:302022-04-07T10:55:25+5:30
Russia-Ukraine War: भारत या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे आम्ही जाणत असून, रशिया पाठिंबा देण्याचे आवाहन या गटाने केले आहे.
मॉस्को: रशियाचे युक्रेनवरील हल्ले (Russia Ukraine War) सुरूच आहेत. रशिया-युक्रेन युद्धाला आता दीड महिना होईल. तरीही दोन्ही देशांमध्ये संघर्ष थांबलेला नाही. युक्रेनच्या विविध भागांवर रशियाने केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे मोठे नुकसान होत आहे. युक्रेनमधील लाखो रहिवासी देश सोडून इतरत्र स्थलांतरित झाले आहेत. अद्यापही रशिया युद्ध थांबवायला तयार नाही. युक्रेनही जोरदार प्रत्युत्तर देत असून, माघार घेण्यास कोणताही देश तयार नाही. अशातच आता रशिया समर्थक गटाने युक्रेनला धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. युक्रेनने माघार घेतली नाही, तर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेसारखी अवस्था करू, असा इशारा देण्यात आला आहे.
रशियाकडून होत असलेल्या भीषण हल्ल्यांमध्ये युक्रेनमधील मारिओपोल आणि बुचासह अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो नागरिकांचा या युद्धात मृत्यू झाला आहे. दोन्ही देशातील परिस्थिती अद्यापही तणावपूर्णच आहे. यातच आता डोनेट्क्स पीपुल्स मिलिशिया ग्रुपच्या अधिकृत प्रतिनिधी एडुआर्ड अलेक्झांड्रोविच बासुरिन यांनी युक्रेनला धमकीवजा इशारा दिला आहे. युक्रेनने रशियाच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर रशिया आणि युक्रेन सीमेची अवस्था भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन सीमेसारखी करू. आताच्या घडीला तेथे जशी परिस्थिती आहे, तशीच येथेही कायम राहील, असे या गटाच्या प्रतिनिधीने म्हटले आहे.
भारताला टार्गेट का केले?
या प्रतिनिधीने सांगितले की, भारतातही प्रादेशिक, भाषा, आस्था यांबाबत मतभेद आहेत. युक्रेनमध्येही भारतासारखी स्थिती आहे. भारत सध्या युक्रेनमधील घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचे आम्हाला माहिती आहे. रशिया-युक्रेन यांच्यात जे काही घडत असेल, त्यात भारताने रशियाला पाठिंबा द्यायला हवा. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या पाच टक्के लोकांनी जरी आम्हाला पाठिंबा दिला तरी आमचा विजय निश्चित आहे आणि हे युद्ध, संघर्ष तत्काळ समाप्त होऊ शकेल, असे आवाहन बसुरिन यांनी यावेळी केले.
दरम्यान, नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी हे युद्ध काही महिने किंवा वर्षे चालू राहणार असल्याचे भाकित केले आहे. जेन्स स्टोल्टनबर्ग म्हणाले की, युक्रेनविरुद्ध रशियाच्या युद्धाला काही महिने किंवा वर्षे लागू शकतात, त्यामुळे रशियाच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी मित्र राष्ट्रांनी युक्रेनला पाठिंबा देणे सुरू ठेवले पाहिजे. युक्रेन रशियाविरुद्ध युद्ध जिंकू शकेल, असा दावा अमेरिकेच्या संरक्षण विभाग पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी जॉन किर्बी यांनी केला. यामागे पुतिन यांचे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले आहे.