रशियाने पहाटे पाच वाजताच युक्रेनच्या राजधानीसह २५ शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरु केले. त्याचवेळी सैन्य आत घुसविले. पठारी भाग असल्याने रशियन सैन्याला तोंड देऊ शकत नाही याची कल्पना युक्रेनला होती. यामुळे तिथे त्यांना फारसा प्रतिकार न करता शहरांच्या आसपास येऊ दिले. इथेच रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा डाव फसला. रशियन फौजा राजधानी कीवच्या वेशीवर पहिल्या १४ तासांतच येऊन पोहोचल्या होत्या.
पुतीन यांना ४८ तासांतच युक्रेनला नमवायचे होते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे शरण येतील आणि आपण जिंकू असा विश्वास पुतीन यांना होता. रशियाकडे नऊ लाख सैन्य तर युक्रेनकडे अवघे १.९० लाख. त्याच प्रमाणात टँक आणि लढाऊ विमाने. युक्रेनचे सैन्य फारकाळ तग धरू शकेल असे पुतीन यांनाच नाही तर जगालाही वाटू लागले होते. परंतू युक्रेनच्या धाडसी सैनिकांना रशियाला चौथ्या दिवशीही कीवमध्ये घुसू दिलेले नाहीय. तर खारकीमधूनही रशियन सैन्याला माघारी जाण्यास भाग पाडले आहे.
युक्रेनचे सैन्य सारे शहरी भागात एकवटले आहे. याचबरोबर शहरातील नागरिकही त्यांना सहभागी झाले आहेत. नव्याने शस्त्रास्त्रे येत आहेत. त्यातच रशियन रणगाडे आणि त्यांची वाहने एवढ्या वेगाने आत आली की रशियापासून खूप लांब होती. यामुळे रशियन सैन्याला इंधन, खाद्य पदार्थांची कुमकही वेळेत पोहोचू शकली नाही. हा रशियन सैन्याला मोठा धक्का होता. रशियाला युक्रेनच्या आकाशावर देखील नियंत्रण मिळविता आलेले नाहीय.
युक्रेनच्या सैन्याने केलेल्या दाव्यानुसार आतापर्यंत साडे तीन हजारहून अधिक रशियन सैनिकांना मारले आहे. काही ठिकाणी रशियन सैनिक युद्ध करण्यास नकार देत असल्याचेही दावे केले जात आहेत. क्रिमियाजवळ तर रशियन सैनिकांनी आपली शस्त्रे, रणगाडे युक्रेनच्या सैन्याला देऊन टाकल्याचा दावा करण्यात आला आहे. खारकीवजवळ ५००० रशियन सैनिकांनी युद्धास नकार दिला आहे.
खार्किव ओब्लास्टचे गव्हर्नर ओलेह सिनेहुबोव्ह म्हणाले की, युक्रेनच्या सैन्याने काही रशियन सैनिकांना ताब्यात घेतले आहे. ज्या रशियन सैनिकांना कैद केले गेले ते खंडणीखोरी आणि नैराश्याबद्दल बोलत आहेत. रशियन सैन्याच्या सेंट्रल कमांडशी त्याचा काहीही संबंध नाही, भविष्यातील नियोजनाबद्दल त्यांना काही कळत नाही किंवा माहित नाही.