Russia Ukraine War: जेलेन्स्कीसोबत चर्चेसाठी पुतिन तयार, बैठकीची तारीख आणि ठिकाण लवकरच ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 10:24 AM2022-03-21T10:24:29+5:302022-03-21T10:24:38+5:30
Russia Ukraine War: दोन्ही देशांदरम्यान चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या, पण युद्धबंदीबाबत ठोस तोडगा निघू शकला नाही.
कीव: रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्की यांनी शांतता चर्चेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. युक्रेन रशियासोबत करार करण्यास तयार आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, ''आम्ही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चेसाठी तयार आहोत. वाटाघाटी करण्यास नकार देणे म्हणजे, WW3 ला आमंत्रण देण्यासारखे आहे''.
दरम्यान, ब्रिटीश वृत्तपत्राने व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांनी जेलेन्स्की यांना भेटण्याचे मान्य केले आहे. बैठकीची तारीख आणि ठिकाण लवकरच निश्चित करण्यात येईल. दोन्ही देशांदरम्यान चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या, पण युद्धबंदीबाबत ठोस तोडगा निघू शकला नाही. उद्या दोन्ही देशांमध्ये चर्चेची पाचवी फेरी होणार आहे.
रशियाचे हल्ले सुरुच
अद्याप रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. रशियन सैन्य युक्रेनमधील निवासी भागांना सातत्याने लक्ष्य करत आहे. रशियन हल्ल्यामुळे युक्रेन जवळजवळ उद्ध्वस्त झाले आहे. देशाची मोठी हानी झाली असली, तरीदेखील युक्रेनचे सैन्य हार मानायला तयार नाही. युक्रेनचे सैन्य खंबीरपणे रशियन सैनिकांना तोंड देत आहे. दोन्ही देशांमधील हे युद्ध कधी संपेल हे सांगणे कठीण असले तरी या युद्धात रशियाचेही मोठे नुकसान झाले आहे.