मॉस्को - रशिया आणि युक्रेनमध्ये पेटलेल्या युद्धाला आता पाच दिवस उलटत आले आहेत. रशियाच्या आक्रमणासमोर दोन तीन दिवसांत युक्रेन शरणागती पत्करेल असे वाटत होते. मात्र युक्रेनचे सैन्य आणि नागरिकांकडून होत असलेल्या चिवट प्रतिकारामुळे रशियन लष्कर हतबल झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या व्लादिमीर पुतीन यांनी सैन्याला अण्वस्त्रे सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पुतीन युक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार का, अशी चिंता जागतिक नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. असे झाल्यास जागतिक इतिहासावर त्याचे गंभीर परिणाम होतील. त्यामुळे पुतीन यांच्या या आदेशामागचा संदर्भ शोधण्याचा प्रयत्न विश्लेषकांकडून केला जात आहे.
विश्लेषकांच्या मते पुतीन यांच्या डोक्यात काय चाललंय याचा अंदाज लावणे भल्या भल्यांना जमत नाही. आधी पुतीन हे युक्रेनवर हल्ला करणार नाहीत, असं वाटत होतं. मात्र त्यांनी युक्रेनवर भीषण हल्ला चढवला. तत्पूर्वीही क्रिमीया हा प्रांत ते ताब्यात घेणार नाहीत, असं वाटत होतं. मात्र त्यांनी क्रिमीया वर कब्जा केला. एवढेच नाही तर पुतीन हे युक्रेनवर संपूर्ण शक्तिनिशी हल्ला करणार नाहीत, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र पुतीन यांनी तेही करून दाखवले. त्यामुळे आता ते मनात आणलं तर युक्रेनवर अणुबॉम्ब टाकू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
युक्रेनवरील आक्रमणाला सुरुवात होण्यापूर्वीची पुतीन यांची वक्तवे पाहिली तर त्यात असं दिसतं की, ते युक्रेनमध्ये विशेष लष्करी मोहीम चालवतील, असं पुतीन यांनी म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात त्यांनी युक्रेनवर थेट हल्ला केला. तसेच यामध्ये कुणी बाहेरच्या देशाने हस्तक्षेप केला तर त्याची अवस्था अशी होईल जी इतिहासात कुणाचीही झालेली नसेल, असा इशाराच पुतीन यांनी दिला आहे. नोबेल पुरस्कार विजेते आणि नोवाया गॅझेट वृत्तपत्राचे एडिटर दिमित्री मुरातोव्ह यांनी सांगितले की, पुतीन यांचं हे वक्तव्य हे जागतिक नेत्यांना थेट अणुयुद्धाची धमकी आहे. दिमित्री यांनी सांगितले की, या टीव्ही मुलाखतीमध्ये पुतीन केवळ रशियाचेच नाही तर संपूर्ण जगाचे शहेंशाह आहेत. ही गोष्ट अशी आहे की कुठल्याही कारचा चालक तिची चावी आपल्या मर्जीनुसार बोटांमध्ये खेळवतो, तशी आहे.