Russia Ukraine War: रशियात सत्तापालटाची शक्यता, होऊ शकते पुतीन यांची हत्या, धक्कादायक दाव्याने खळबळ
By नितीन जगताप | Published: May 4, 2022 03:02 PM2022-05-04T15:02:00+5:302022-05-04T15:03:22+5:30
Vladimir Putin News: रशियामध्ये लष्कराच्या माध्यमातून सत्तांतर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये व्लादिमीर पुतीन यांची हत्या होऊ शकते. माजी अमेरिकन जनरल जॅक केन यांनी सांगितले की, पुतीन यांनी ज्या कमकुवत पद्धतीने युद्ध हाताळले आहे त्यामुळे रशियाच्या सैन्यातील वरिष्ठ अधिकारी आणि सिक्युरिटी सर्व्हिसशी संबंधित लोक निराश आहेत.
मॉस्को - रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला आता ७० दिवस होत आले आहेत. मात्र युद्ध अद्यापही निर्णायक स्थितीपर्यंत पोहोचलेले नाही. पुतीन यांना युक्रेनवर पूर्ण कब्जा करायचा आहे. त्याचदरम्यान, आता रशियामध्ये लष्कराच्या माध्यमातून सत्तांतर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये व्लादिमीर पुतीन यांची हत्या होऊ शकते. माजी अमेरिकन जनरल जॅक केन यांनी सांगितले की, पुतीन यांनी ज्या कमकुवत पद्धतीने युद्ध हाताळले आहे त्यामुळे रशियाच्या सैन्यातील वरिष्ठ अधिकारी आणि सिक्युरिटी सर्व्हिसशी संबंधित लोक निराश आहेत. पुतीन यांनी युद्धादरम्यान, केलेल्या एकंदरीत हाताळणीवर रशियातील गुप्तचर सेवेचे प्रमुख सर्गेई नारिश्किनसुद्धा नाराज आहेत.
मात्र जनरल जॅक केन यांनी सांगितले की, सत्तेमध्ये राहण्यासाठी पुतीन काहीही करू शकतात. आपण हे सत्य स्वीकारले पाहिजे की, पुतीन सत्ता सोडून कुठेही जाणार नाहीत. जर कुणी अन्य सत्तेत आला तर आपण जिवंत राहणार नाही हे पुतीन यांना ठावूक आहे. फॉक्स न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितले की, कुठल्याही परिस्थितीत सत्तेमध्ये राहायचे हे पुतीन यांचे लक्ष्य आहे. ते सत्तेसाठी काहीही करू शकतात. त्यांनी पुढे सांगितले की, आपल्या जागी कुणी अन्य आलं तर आपला अंत निश्चित आहे, याची पुतीन यांना जाणीव आहे.
पुतीन हे सत्तेत कायम राहण्यासाठी लढत आहेत. त्यासोबतच ते आपल्या लक्ष्याबाबत दृढ आहे. त्यासाठी त्यांचं लक्ष्य युक्रेनमध्ये आहे. तसेच ते अद्यापही युक्रेनवर कब्जा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मी पुतीन यांच्या हेतूबाबत गांभीर्याने विचार करत आहे. आम्ही त्यांना अनेकदा सवलत दिली आहे. मात्र ते पुन्हा एकदा रशियन साम्राज्याला स्थापन करू इच्छित आहेत. मात्र पुतीन राष्ट्रपतीपदावर राहिले नाहीत तर त्यांचं कुठलंही भविष्य नसेल.
समोर येत असलेल्या माहितीनुसार रशियामधील एक शक्तिशाली राजकीय आणि लष्करी गट किव्हमधून सैन्याची माघार आणि डोनबासवर नियंत्रण मिळवण्याच्या निर्णयाला एक गंभीर चूक मानत आहे. तसेच त्याचे खापर पुतीन यांच्यावर फोडत आहेत. त्याचं कारण म्हणजे रशिया अगदी सहजपणे किव्हपर्यंत मुसंडी मारेल, अशी अपेक्षा आहे. रशियन सैन्याच्या कमकुवत कामगिरीबरोबरच पुतीन यांच्या आरोग्याच्या समस्यांशी संबंधी वृत्त येत आहे. तसेच पुतीन यांचे निकटवर्तीयच त्यांच्याविरोधात उभे राहत आहेत. तसेच मतभेद वाढत आहेत.