मॉस्को – यूक्रेनवर रशियानं हल्ला करून ७ दिवस उलटले तरी अद्याप यूक्रेन हाती मिळाला नाही. रशियानं यूक्रेनच्या अनेक शहरात विनाश सुरू केला आहे. तर आता रशियामध्येही युद्धाचे परिणाम जाणवू लागले आहेत. बलाढ्य रशियानं यूक्रेनवर हल्ला केला आणि त्याला अमेरिकेसह पाश्चात्य देशांच्या निर्बांधांना सामोरं जावं लागलं. रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. रशियन बँकांचे अकाऊंट फ्रिज केलेत. त्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. डॉलरच्या तुलनेत रशियन मुद्रा मोठ्या प्रमाणात घसरली आहे.
रशियातील श्रीमंतापासून गरिबांपर्यंत सर्वांना पैशांची चणचण भासू लागली आहे. कारण रशियन बँकांवर पाश्चात्य देशांनी लावलेल्या निर्बंधाचा परिणाम दिसू लागला आहे. खाद्य तेलाच्या किंमती भडकल्या आहेत त्यामुळे रशियाची सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. रशियन मुद्राचे दर घसरल्याचे परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हताश झालेला रशियन नागरिक पैसे काढण्यासाठी एटीएम बाहेर रांगा लावल्याचं चित्र रशियामध्ये दिसून येत आहे.
अमेरिकेसह नाटो देशांनी रशियाच्या केंद्रीय बँकांची संपत्ती फ्रीज केली आहे. जागतिक बँकेपासून रशियाला वगळण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे रशियावर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. रशियातील थेट गुंतवणूक रोखणार असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. आतापर्यंत रशियाला ६३० अरब डॉलरचं नुकसान झालं आहे. रशियाला हे युद्ध खूप महागात पडत असल्याचं चिन्ह आहे. ऑस्ट्रेलियाच्या न्यूज पोर्टलनुसार, निर्बंधामुळे रशियात मोठी मंदी येऊ शकते. रशियासमोर मोठं संकट उभं राहू शकतं. त्यामुळे घाबरलेल्या स्थितीत रशियन नागरिक बँकांसमोर गर्दी करत पैसे काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
रशियात युद्धापूर्वी ७५ रुबलची किंमत १ डॉलर इतकी होती. परंतु त्यात युद्धामुळे घट झाली आहे. १ डॉलरसाठी आता लोकांना ११३ रुपये मोजावे लागत आहेत. रुबलच्या दरात घट होत असल्याने खाद्यपदार्थापासून इंधनापर्यंत, प्रत्येक वस्तूचे दर गगनाला भिडले आहेत. रशियात आगामी काळात बेरोजगारी वाढणार असून लवकरच सुपरमार्केट्समधील सामान संपणार आहे. त्यामुळे रशियन लोकं अत्यावश्यक सामनासोबतच बँकांमध्ये जमा असलेली रक्कम काढण्यासाठी धावपळ करत आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी त्यावर उपाय योजले आहेत. देशातील नागरिकांना परदेशी पैसे पाठवण्यावर निर्बंध आणले आहेत. त्यासोबत निर्यातदारांना त्यांच्या कमाईतील ८० टक्के रुबलमध्ये रूपांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रशियाच्या सेंट्रल बँकेनेही व्याजदर ९.५ टक्क्यांवरून २० टक्के केला आहे. 'व्याजदरात वाढ केल्याने रुबल स्थिर होण्यास मदत होऊ शकते परंतु लोकांना त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज घेणे खूप महाग होईल आणि त्यामुळे रशियाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो असं अमेरिकन प्रोफेसर पीटर रटलँड यांनी सांगितले आहे.