रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धातून माघार घेणाऱ्या सैनिकांना गोळी घालण्याचा आदेश दिला आहे. तसेच, यासाठी रशिया विशेष तुकडीही तैनात करत आहे, असा दावा ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी गुप्तचर विभागाच्या अहवालाचा हवाला देत केला आहे. एवढेच नाही, तर रशियन सैन्याचा युद्धातील उत्साह आणि त्यांचे मनोधैर्य कमी झाल्याने रशियाने असे पाऊल उचलले असल्याचेही ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेने म्हटले आहे.
इशाऱ्यानंतर शूट करण्याचा आदेश - युद्धातून मागे हटणाऱ्या सैनिकांविरोधात शस्त्राचा वापर करण्यात यावा, असा आदेश रशियन जनरलने आपल्या कमांडर्सना दिला आहे. एवढेच नाही, तर इशारा दिल्यानंतरही सैनिक ऐकण्यास तयार नसतील, तर त्यांना गोळी घालण्याचा आदेशही यात सामील आहे, असेही ब्रिटेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, विविध रिपोर्ट्स आणि गुप्तचर विभागाच्या अपडेटनुसार, सप्टेंबर महिन्यात रशियाचा झालेला पराभव आणि युक्रेनने पुन्हा एकदा आपल्या भागांवर मिळवलेल्या कब्जा मुळे रशियन सैनिकांचे मनोबल ढासाळले आहे.
पुतिन स्वत: सांभाळत आहेत मोर्चा -रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी, आपल्या सैनिकांना माघार घेण्यापासून रोखण्यासाठी, स्वतः मोर्चा साभाळला आहे. सप्टेंबर महिन्यात न्युयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, खेरसान शहरात युक्रेनचा वाढता हस्तक्षेप पाहून रशियन सैनिकांनी राष्ट्रपती पुतिन यांना मागे हटण्याची विनंती केली होती. मात्र, पुतिन यांनी त्यांची ही विनंती फेटाळली होती.
रशियाने युद्धातून माघार घेणाऱ्या सैनिकांच्या शिक्षेतही वाढ केली आहे. रशियाने सप्टेंबर महिन्यात एक विधेयक मंजूर केले असून या विधेयकाद्वारे युद्धातून माघार घेणाऱ्या सैनिकांची शिक्षा 5 वर्षांवरून 10 वर्षे करण्यात आली आहे. या शिक्षेच्या अंमलबजावणीची परवानगी देणाऱ्या डिक्रीवर पुतिन यांनी स्वाक्षरी करत बिलावर शिक्का मोर्तबही केले आहे.