रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर बाल्टिक देश एस्टोनिया, लॅटव्हिया आणि लिथुआनिया या देशांचे टेन्शन वाढवले आहे. पूर्वी हे देश सोव्हिएत युनियनचा भाग होते. यामुळे हे देश रशियाचे पुढचे लक्ष असू शकतात, अशी भीती येथील लोकांच्या मनात आहे. तसेच रशियाच्या युक्रेनवरील या हल्ल्याने निर्वासन आणि छळाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.
लिथुआनियाची राजधानी विनियस येथील एक 50 वर्षीय शिक्षक जौनियस काजलॉस्कस एपी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, माझ्या आजी-आजोबांना सायबेरियात पाठवण्यात आले होते. रशियन गुप्तचर संस्था केजीबीने माझ्या वडिलांचा छळ केला होता. आता मी एका स्वतंत्र लोकशाही देशात राहतो. मात्र, कुठलीही गोष्ट सहजतेने घेतली जाऊ शकत नाही, असे वाटते.
'पुतीन यांना रोखले गेले नाही तर...' -एस्टोनिया, लॅटव्हिया आणि लिथुआनिया हे तिन्ही देश सध्या नाटोचे सदस्य आहेत. हे देश 2004 मध्ये नाटोमध्ये सामील झाले. महत्वाचे म्हणजे, युक्रेन नाटोचा भाग नाही. बाल्टिक देश आणि पोलंड नेहमीच मॉस्कोवर कठोर निर्बंध घालण्याची मागणी करत आले आहेत. तसेच, लिथुआनियाचे परराष्ट्र मंत्री गॅब्रियलियस लँड्सबर्गिस यांनी नुकतेच, युक्रेनचा लढा हा युरोपचा लढा आहे, पुतीन यांना तेथेच रोखले गेले नाही, तर ते पुढे सरकतील, असे म्हटले आहे.
लॅटव्हियाच्या संरक्षण मंत्रालयाचे राज्य सचिव जेनिस गॅरिसन म्हणाले, रशिया नेहमीच सैन्य शक्तीचा अंदाज घोतो. एढेच नाही, तर तो देशांची लढण्याची इच्छाही बघतो. यानंतर, जेव्हा त्याला एखाद्या देशाची कमजोरी दिसते, तेव्हा तो त्या कमजोरीचा फायदा घेतो.