किव्ह : रशियाने केलेल्या हल्ल्यांत आतापर्यंत युक्रेनमधील २१३ मुलांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याशिवाय ३८९ मुले जखमी झाली आहेत. ही माहिती युक्रेन सरकारने दिली आहे.
युक्रेनमध्ये युद्धात मरण पावलेल्या मुलांची संख्या डोनेत्स्क भागात सर्वाधिक आहे. तिथे १२२ मुले मृत किंवा जखमी झाली आहेत. त्यापाठोपाठ किव्ह परिसरात ११४, खारकिवला ९१, चेर्निहिवमध्ये ६६, खेरसनमध्ये ४४, मायकोलिवला ४३, लुहान्स्कमध्ये ३७, जापोरिज्जियात २७, सुमी येथे १७, किव्ह शहरात १६, जॉइटॉमिरमध्ये १५ मुले रशियाच्या हल्ल्यांमुळे जखमी किंवा मरण पावली आहेत. मारियुपोल व अन्य ठिकाणी अडकलेल्यांपैकी लहान मुले, महिला, वयोवृद्धांची सुटका करण्याच्या मोहिमेत रशिया अडथळे आणत असल्याचा आरोप युक्रेनने केला होता. याबाबत मारियुपोलमध्ये भीषण स्थिती असल्याचे युक्रेनच्या प्रवक्त्याने सांगितले.
रशियाला हरविणे शक्य : ऑस्टिनयुक्रेनकडे योग्य लष्करी साधनसामग्री व शस्त्रास्त्रे असल्यास ते युद्धात रशियाला हरवू शकतील, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी म्हटले आहे. या युद्धात आपण जिंकू शकतो हा विश्वास युक्रेनच्या लष्करामध्ये जागृत झाला आहे. त्यामुळे ते चिकाटीने रशियाविरोधात लढत देत आहेत. या युद्धात रशियाच्या लष्कराचेही नुकसान झाले आहे. त्याचा रशियाच्या युद्धातील कामगिरीवरही परिणाम होत आहे, असेही ऑस्टिन यांनी सांगितले.