Russia Ukraine War: रशियाचा मोठा हल्ला, सेंट्रल खारकिव्हमध्ये मिसाईल डागली; शाळेची भिंत भेदून क्लासरुममध्ये ब्लास्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 08:28 PM2022-03-02T20:28:37+5:302022-03-02T20:29:58+5:30
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस असून रशियानं युद्ध कारवाई आणखी तीव्र केली आहे. युक्रेनमधील खारकिव्ह शहर युद्धाची रणभूमी बनलं आहे.
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस असून रशियानंयुद्ध कारवाई आणखी तीव्र केली आहे. युक्रेनमधील खारकिव्ह शहर युद्धाची रणभूमी बनलं आहे. संपूर्ण शहर उद्ध्वस्त झालं आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली असून रशियानं सेंट्रल खारकीव्हमध्ये मोठी मिसाईल डागली आहे. या मिसाईलमधून खारकीव्हमधील शाळेला लक्ष्य करण्यात आलं आहे. मिसाइलनं शाळेची भींत भेदून थेट क्लासरुममध्ये भयानक स्फोट झाला आहे. युक्रेनमधील खारकीव्ह आणि कीव या दोन शहरांमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे.
युक्रेनवर एअर स्ट्राइक करण्याची तयारी रशियानं सुरू केली आहे. तसा अलर्ट युक्रेनमधील महत्वाच्या शहरांमध्ये एअर सायरनच्या माध्यमातून दिला जात आहे. युक्रेनची राजधानी कीवसह खारकीव्ह सारख्या मोठ्या शहरांमध्ये सायरन वाजू लागले आहेत. तसंच सुमी, चरकासी आणि पोलटावा या शहरांमध्येही सायरन वाजत आहेत. रशियाकडून कोणत्याही क्षणी युक्रेनवर हवाई हल्ला होण्याची शक्यता आहे.
कीवमधील टेलीव्हिजन टॉवरवर हल्ला
कीव मध्ये एक टीव्ही टॉवरवर हल्ला करण्यात आला. युक्रेनच्या संसदेनं एका फोटोच्या माध्यमातून याची माहिती दिली. टेलिव्हिजन टॉवरवरील हल्ल्यानंतर देशातील टेलिव्हिजन वाहिन्यांचं प्रसारण बंद झालं आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानंही या हल्ल्याची पुष्टी केली आहे.
खारकीव्ह सोडण्याच्या सूचना
युक्रेनमध्ये भारतीय दूतावासाने खारकीव्ह भारतीय नागरिकांसाठी तातडीची अॅडव्हायजरी जारी केली आहे. सर्व भारतीयांनी आज रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मिळेत त्या मार्गानं आणि प्रवासाचं साधन उपलब्ध न झाल्यास पायी प्रवास करत तातडीनं खारकीव्ह शहर सोडावं अशा सूचना भारतीय दूतावासाकडून देण्यात आल्या आहेत. त्यासाठीची नवी अॅडव्हायझरी देखील जारी करण्यात आली आहे.