गुरुवारी रात्री रशियाच्या लढाऊ विमानानं मोठी चूक केली. युक्रेनशी युद्ध सुरू असतानाच रशियाच्या लढाऊ विमानानं आपल्याच देशातील बेलगोरोड या शहरात बॉम्ब टाकला. त्यामुळे सुमारे ४० मीटर मोठा खड्डा पडला. एवढंच नाही तर आजूबाजूच्या इमारतींचंही नुकसान झालंय. बॉम्ब पडल्यानं एक कारही उद्ध्वस्त झाली. रशियाचं Su-34 हे लढाऊ विमान बेलगोरोड शहराजवळून जात असताना बॉम्ब पडला. बेल्गोरोड शहर युक्रेनला लागून आहे त्यांच्या उत्तर सीमेला हे शहर आहे. रशियन न्यूज एजन्सी TASS नं या घटनेची माहिती दिली आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्र्यांचा हवाला देत एजन्सीनं म्हटलं की, 'स्थानिक वेळेनुसार २२:१५ वाजता Su-34 लढाऊ विमान बेलगोरोड शहरावरून जात होतं. दरम्यान, त्याचवेळी हा बॉम्ब चुकून पडला. बेल्गोरोडचे महापौर व्हॅलेंटीन डेमिडोव्ह यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवरही याची माहिती देत लिहिलं की बॉम्बमुळे अनेक अपार्टमेंटमधील इमारतींचे नुकसान झालं आहे. एवढंच नाही तर बॉम्ब पडल्यानं झालेल्या स्फोटामुळे दोन जण जखमीही झाले आहेत, असंही त्यांनी नमूद केलंय.
रशियन लष्करानं गेल्या वर्षीच Su-34 लढाऊ विमानं आपल्या ताफ्यात समाविष्ट केली होती. रशियन मीडियानं याबाबत माहितीही दिली होती. त्यात किती लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला आहे सांगण्यात आलेलं नाही.
यांचा फायदा नाहीच?ही लढाऊ विमानं रशियासाठी कमकुवत ठरल्याचं म्हटलं जात आहे. युक्रेनशी युद्ध सुरू झाल्यापासून यापैकी १० टक्के किंवा त्याहून अधिक नष्ट झाल्याचंही सांगण्यात येतंय. ओरीक्स या नेदरलँड-आधारित गुप्तचर वेबसाइटनं दावा केलाय की युक्रेनसोबतच्या युद्धानंतर १९ रशियन Su-34 लढाऊ विमानं नष्ट झाली आहेत. अशा परिस्थितीत रशियाच्या शस्त्रास्त्रांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे रशियानं गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केला होता आणि तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. सध्या तरी हे युद्ध थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत.