Russia-Ukraine war: युक्रेनचे 'स्वप्न' नष्ट; रशियाने उडवले जगातील सर्वात मोठे विमान, पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 06:07 PM2022-03-04T18:07:26+5:302022-03-04T18:07:37+5:30
Russia-Ukraine war: रशियाने युक्रेनचे AN-225 Mriya विमान नष्ट केले आहे. हे जगातील सर्वात मोठे विमान होते.
कीव: मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. यादरम्यान दोन्ही देशांनी एकमेकांच्या अनेक विमान, वाहने आणि इतर वस्तुंना नष्ट केले आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात रशियाकडून युक्रेनच्या जगातील सर्वात मोठ्या 'AN-225 Mriya' विमानाला नष्ट केल्याचा दावा करण्यात येत होता. त्या दाव्याला सिद्ध करणारा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.
युक्रेनचे 'स्वप्न' नष्ट
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी स्वत: ट्विटरवर जाहीर केले की, देशाचा राष्ट्रीय अभिमान असलेले AN-225 मारिया नष्ट झाले आहे. हे जगातील सर्वात मोठे विमान होते. रशियाने युक्रेनच्या 'मारिया'चा नाश केला असेल, पण एक मजबूत, मुक्त आणि लोकशाही युरोपीय राज्याचे आमचे स्वप्न ते कधीही नष्ट करू शकणार नाहीत. युक्रेनियन भाषेत मारिया या शब्दाचा अर्थ म्हणजे स्वप्न असा होतो.
😨 NO NO NO NO…
— ANTONOV Company 🇺🇦 (@AntonovCompany) March 3, 2022
Currently, until the #AN225 has been inspected by experts, we cannot report on the technical condition of the aircraft.
Please wait for the official announcements about the condition of the aircraft#StopRussia#Ukrainehttps://t.co/pEXDanePTw
विमानाच्या कंपनीने दिले अपडेट
कुलेबाने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये कीवजवळील विमानतळावरचा असून, व्हिडिओत विमानातून काळा धूर निघताना दिसत आहे. मात्र, विमान बनवणाऱ्या अँटोनोव्ह या कंपनीने व्हायरल झालेल्या व्हिडिओवर एक अपडेट ट्विट करत म्हटले आहे की, तांत्रिक तज्ज्ञ विमानाच्या सद्यस्थितीची पाहणी करत आहेत. त्यांनी नेटकऱ्यांना विमानाच्या स्थितीबाबत कोणत्याही अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करण्यास सांगितले.
असे होते मारिया...
एंटोनोव्हचे व्यवस्थापन करणारी कंपनी युक्रोबोरोनप्रॉमच्या म्हणण्यानुसार, या विमानाला आता ठीक करण्यासाठी $3 अब्ज खर्च येईल आणि विमान त्याच्या मूळ स्थितीत आणण्यासाठी वेळही लागेल. युक्रेनमध्ये डिझाईन केलेल्या आणि तयार केलेल्या AN-225 मरियाने 21 डिसेंबर 1988 रोजी पहिले उड्डाण केले होते. या जगातील सर्वात मोठ्या विमानात सहा इंजिन, 32 चाके आणि 88.4 मीटरचे पंख आहेत. मारियाच्या नावावर 253 टन एवढ्या वजनाच्या कोणत्याही विमानाचा सर्वात वजनदार पेलोडचा जागतिक विक्रम आहे.