रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन जवळपास 50 दिवस झाले आहेत. रशियाकडून युक्रेनवर अद्यापही बॉम्बिंग सुरूच आहे. यातच, मारियुपोलमध्ये सुमारे 1000 युक्रेनियन सैनिकांनी आत्मसमर्पण केल्याचा मोठा दावा रशियाकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, बूचा हत्याकांडानंतर संपूर्ण जगातून टीका होत असतानाही रशियन सैनिक सर्वसामान्यांना निशाणा बनवताना दिसत आहेत.
युक्रेनच्या एका मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैनिकांच्य हल्ल्यात बूचा आणि कीवच्या उपनगरांमध्ये 720 हून अधिक नागरिक मारले गेले असून, 200 हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. बूचाचे महापौर, अनातोली फेडोरुक यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकट्या बूचातच 403 मृतदेह आढळून आले आहेत. तसेच, मरणारांचा आकडा आणखी वाढण्याचीही शक्यता आहे, कारण येथे माइनस्वीपर्सचा शोध सुरू आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन समर्थक नेते व्हिक्टर मेदवेदचुक यांना, रशियन सैन्याकडून बंदी बनवण्यात येत असलेल्या पुरुष आणि महिला कैद्यांच्या जागी अदला-बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. झेलेंस्की म्हणाले, "आमच्या संरक्षण दलाला आणि सैन्य दलाला, अशा प्रकारच्या शक्यतांवर विचार करणे आवश्यक आहे." तसेच, मंगळवारी युक्रेनच्या संरक्षण दलाने म्हटल्यानुसार, त्यांनी मेदवेदचुक यांना अटक केली आहे. मेदवेदचुक हे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे युक्रेनमधील सर्वात जवळचे आणि सर्वाधिक प्रभावी सहकारी आहेत.