युद्धात आणि प्रेमात सारे काही माफ असते असे म्हटले जाते. परंतू युद्धाचे स्वत:चे असे काही नियम आहेत. त्या नियमांनीच युद्ध लढले जाते. समोर शत्रू उभा असताना त्याच्यावर हल्ला करणे गैर नाही, परंतू तो जखमी अवस्थेत उपचार घेत असताना त्याच्यावर हल्ला करणे हे गैर आहे. रशियाला काहीही करून युक्रेन ताब्यात घ्यायचे आहे. यामुळे रशियन सैनिक खालच्या पातळीवर उतरून हल्ले करू लागले आहेत.
खारकीव आणि खेरसनमध्ये मध्यरात्रापासून भीषण लढाई सुरु होती. यावेळी रशियाच्या सैन्याने खारकीवमधील युक्रेनच्या सैन्याच्या हॉस्पिटलवर भीषण हल्ला केला. या मिलिट्री हॉस्पिटलवर रशियाने पॅराट्रूपर्स उतरवले आणि जोरदार हल्ला चढविला. या हॉस्पिटलमध्ये जखमी सैनिकांवर उपचार सुरु होते. दरम्यान रशियाने खेरसन ताब्यात घेतले आहे. तर खारकीववर जोरदार हल्ले केले जात आहेत.
खेरसनच्या चौकाचौकात रशियन रणगाडे दिसत आहेत. सात दिवस लोटले तरी युक्रेन ताब्यात येत नसल्याने पुतीन चिडले आहेत. त्यांनी युक्रेनवर अण्वस्त्र हल्ले करण्यासाठी बटालियनला तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे या बटालियनने युद्धसराव करण्यास सुरुवात केली आहे. युक्रेन सहज हाती येईल असे पुतीन यांना वाटले होते. परंतू युक्रेन सैनिकांसोबत नागरिकांच्या चिवट प्रतिकारामुळे रशियन सैन्याला जबर हादरा बसला आहे.
त्यातच युरोपीयन देश या सैनिकांना शस्त्रे आणि अन्नधान्य पुरवत आहेत. यामुळे युक्रेनच्या सैन्याचे मनोबल उंचावले आहे. युक्रेनच्या सैन्याने कीवच्या वेशीवरच रशियन सैन्याला रोखले आहे. तर खारकीवमध्ये रशियन सैन्याला मागे पिटाळले होते. त्यावर पुन्हा कब्जा करण्यासाठी रशियाने सरकारी इमारतींवर मिसाईल हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.