Russia-Ukraine War: 'रशियाने 2 लाख मुलांना बंदी बनवले', युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्कींचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 05:05 PM2022-06-02T17:05:50+5:302022-06-02T17:05:58+5:30
Russia Ukraine War: 'आम्ही कधीच पराभव स्विकारणार नाही, हे आम्ही रशियाला युद्धभूमीवर दाखवू.'
Russia Ukraine Conflict: गेल्या शंभर दिवसांपासून रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धात हजारो सैनिक आणि नागरिकांचा मृत्यू झालाय. दरम्यान, युक्रेनने आता रशियावर एक गंभीर आरोप केला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्की यांनी बुधवारी दावा केला की, रशियाने हजारो युक्रेनियन नागरिकांना बंदी बनवून रशियात नेले आहे. यात 2,00,000 मुलांचा समावेश आहे.
जेलेन्स्कीच्या आरोपानुसार, बंदी बनवलेल्या मुलांमध्ये अनाथाश्रमातील मुले, पालकांसोबत असलेली मुले आणि कुटुंबापासून विभक्त झालेली मुले यांचा समावेश आहे. या गुन्हेगारी धोरणाचे उद्दिष्ट फक्त लोकांना पळवणे नाही, तर त्यांच्या हृदयातून युक्रेनला पुसून टाकणे आहे, असा आरोपही जेलेन्स्कींनी केला. ते बुधवारी आंतरराष्ट्रीय बाल दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
'युक्रेन जबाबदारांना शिक्षा करेल'
झेलेन्स्की पुढे म्हणाले की, युक्रेन जबाबदार असलेल्यांना शिक्षा करेलच, परंतु प्रथम रशियाला युद्धभूमीवर दाखवेल की, युक्रेन जिंकता येणार नाही. आमचे लोक शरणागती पत्करणार नाहीत. आमची मुले रशियाची मालमत्ता होणार नाहीत.
'युद्धात 243 मुले मारली गेली'
जेलेन्स्कींनी यावेळी दावा केला की, युद्धात आतापर्यंत 243 मुले मारली गेली आहेत, तर 446 जखमी आणि 139 बेपत्ता आहेत. हा आकडा जास्त असू शकतो कारण त्यांच्या सरकारकडे रशियन सैन्याने ताब्यात घेतलेल्या भागातील परिस्थितीचे संपूर्ण चित्र नाही. यावेळी जेलेन्स्कींनी 11 मुलांचा उल्लेख केला, त्यांना त्यांच्या नावाने संबोधून त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.