मारियुपोलमध्ये रशियाकडून ९ हजार मृतदेहांची विल्हेवाट? संभाव्य दफनभूमींची उपग्रहाने टिपलेली छायाचित्रे उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 08:31 AM2022-04-23T08:31:10+5:302022-04-23T08:33:08+5:30
मारियुपोल शहर जिंकल्याचा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केल्यानंतर, काही तासातच या सामुदायिक दफनभूमींची छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकविण्यात आली.
कीव्ह : रशियाने बेचिराख केलेल्या मारियुपोल शहरात युद्धामध्ये ठार झालेल्या नागरिकांच्या मृतदेहांचे सामुदायिक दफन केल्याचा आरोप झाला होता. या संभाव्य सामुदायिक दफनभूमींची उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकली आहेत. रशियाच्या सैनिकांनी मारियुपोलमधील नऊ हजार जणांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
मारियुपोल शहर जिंकल्याचा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केल्यानंतर, काही तासातच या सामुदायिक दफनभूमींची छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकविण्यात आली. मारियुपोलमधील स्टील प्रकल्पाच्या आडोशाने अजूनही युक्रेनचे दोन हजार सैनिक रशियाशी झुंज देत असून, त्यामुळे खरे तर या शहरावर पुतीन यांना पूर्ण कब्जा मिळविता आलेला नाही; पण त्या शहरात विजयी झाल्याचा प्रचार रशियाने चालविला आहे.
मारियुपोलमध्ये रशियाने २०० ठिकाणी सामुदायिक दफनभूमी तयार केल्या असून, तिथे मृतदेह पुरले जात असल्याचा आरोप होत आहे. या शहराबाहेर मनहुश भागात पूर्वी असलेल्या दफनभूमीपासून काही अंतरावरच सामुदायिक दफन केले जाते. त्या दफनभूमीची छायाचित्रेही उपग्रहाने टिपली आहेत.
ही तर नाझी कृत्ये -
- मारियुपोल शहराचे महापौर वदिम बोयचेन्को यांनी म्हटले आहे की, रशियाचे सैनिक आपली युद्धगुन्हेगारी लपविण्यासाठी मृतदेह सामुदायिक दफनभूमींमध्ये पुरत आहेत.
- १९४१ मध्ये जर्मनीच्या नाझी सैन्याने युक्रेनमधील ३४ हजार ज्यूंना ठार मारले होते.
- बाबियार या ठिकाणी ही भयंकर कृत्ये घडली होती. रशियाचे सैनिक आता नवे बाबियार घडवीत आहेत, असा आरोप बोयचेन्को यांनी केला.
रशियाकडून अद्याप प्रतिक्रिया नाही -
- मारियुपोल शहरात रशियाच्या सैनिकांनी उघडलेल्या सामुदायिक दफनभूमींची छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकल्यानंतरही पुतीन सरकारने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
- बुका शहर व कीव्ह परिसरात अनेक मृतदेह सापडल्यानंतर, हे तर युक्रेनचेच कारस्थान आहे, असा कांगावा रशियाने केला होता; पण आता तशीही प्रतिक्रिया देणे रशियाने टाळले आहे.
रशियात लष्करी केंद्राच्या आगीत सहा जणांचा मृत्यू -
- मॉस्को : रशियातील त्वेर शहरामध्ये लष्करी संशोधन केंद्राला लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले आहेत. इमारतीला आग लागल्यानंतर काही लोकांनी जीव वाचविण्यासाठी खिडकीतून खाली उडी मारली. या प्रयत्नात काही जण जखमी झाले.
- या लष्करी संशोधन केंद्राच्या प्रशासकीय विभागात प्रथम आग लागली. त्यानंतर या आगीने संपूर्ण इमारतीलाच घेरले. त्यामुळे तेथील लोकांनी जीव वाचविण्यासाठी खि़डकीतून खाली उड्या मारल्या. त्यात काहींचा जीव गेला, तर काही जण जखमी झाले.
- या संशोधन केंद्रातील जुन्या वायरींमुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली असावी, असे म्हटले जात आहे. मात्र त्याला रशिया सरकारने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
- हवाई सुरक्षेबाबत या लष्करी केंद्रामध्ये संशोधन चालते. लढाऊ विमानरोधक प्रणाली अधिक अद्ययावत करण्याचेही काम या केंद्रात चालते. त्यामुळे इतक्या महत्त्वाच्या केंद्राला आग लागल्याने रशियाच्या लष्कराचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
- या आगीत सापडलेल्यांपैकी आणखी १० जण अद्याप बेपत्ता आहेत, असे एका वृत्तात म्हटले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी बरेच तास शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.