Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज १३ वा दिवस असून दोन्ही देशांमधील चर्चेची तिसरी फेरी देखील निष्फळ ठरली आहे. त्यामुळे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युक्रेनच्या सरकारनं केलेल्या दाव्यानुसार रशियन सैन्यानं रात्री उशीरा सुमी येथे तब्बल ५०० किलो वजनाचे बॉम्ब टाकले आहेत. यात २ लहान मुलांसह १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे सुमी येथे जवळपास ७०० भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत.
ताज्या माहितीनुसार वैद्यकीय विद्यार्थ्यांना तिथून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत रेड क्रॉस आणि भारतीय दूतावासाचे लोक असल्याची माहिती समोर आली आहे. रशियन सीमेपासून अवघ्या ६० किमी अंतरावर असलेल्या सुमी येथे दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे.
कीव्हमध्ये मोठ्या हल्ल्याचा अलर्टयुक्रेनची राजधानी कीव्ह येथे रशियन सैन्याकडून मोठ्या हल्ल्याचा अलर्ट देण्यात आला आहे. रशियाचा मोठा फौजफाटा कोणत्याही क्षणी कीव्हमध्ये धडकण्याची शक्यता असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. कीव्ह शहराच्या उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागातही रशियन सैन्य सज्ज आहे. आता पू्र्वेकडूनही रशियन सैन्य येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.