Russia Ukraine War : भीषण! रशियाने युक्रेनवर डागले रॉकेट; ५० हून अधिक हवाई हल्ले, ११ जणांचा मृत्यू, ४० जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 11:02 AM2024-07-08T11:02:06+5:302024-07-08T11:12:33+5:30
Russia Ukraine War : रशियाने गेल्या २४ तासांत युक्रेनवर ५५ हून अधिक वेळा हवाई हल्ले केले. यामध्ये ११ जणांना आपला जीव गमवावा लागला असून ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
दोन वर्षांपासून सुरू असलेले युक्रेन-रशिया युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहेत. रशियाने गेल्या २४ तासांत युक्रेनवर ५५ हून अधिक वेळा हवाई हल्ले केले. यामध्ये ११ जणांना आपला जीव गमवावा लागला असून ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
रशियन न्यूज एजन्सी आरआयएने दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्याने शुक्रवारी युक्रेनमधील वेगवेगळ्या ठिकाणी सहा रॉकेट आणि ७० हून अधिक बॉम्बने हल्ले केले. युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रशियन सैन्य रात्रभर अधूनमधून हल्ले करत आहे. रशियाने उत्तर युक्रेनमधील एका पॉवर प्लांटवर हल्ला केला आहे. प्लांटमध्ये झालेल्या स्फोटामुळे वीजयंत्रणा कोलमडली असून, त्यामुळे सुमारे एक लाख लोक विजेशिवाय जगत आहेत.
युक्रेनने रशियाचे २४ ड्रोन पाडले
युक्रेनच्या जनरल स्टाफने सांगितलं की, शनिवारी युक्रेन आणि रशियाच्या सैन्यांमध्ये ४५ चकमकी झाल्या. रशियन सैनिक ड्रोनद्वारे पाण्याच्या टाक्यांनाही लक्ष्य करत आहेत. युक्रेनने २७ पैकी २४ रशियन ड्रोन पाडले. देशात सर्वाधिक नुकसान पूर्वेकडील भागात झाले आहे. त्याचवेळी, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी पूर्व युक्रेनमधील ३० किलोमीटरचा परिसर ताब्यात घेतला आहे.
१० हजार लोकांचा युद्धात मृत्यू
युक्रेन रशिया युद्धाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. २४ फेब्रुवारी २०२२ ला सुरू झालेले युद्ध आजतागायत थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आतापर्यंत युक्रेनमधील १० हजार लोकांचा या युद्धात मृत्यू झाला आहे, तर १८,५०० लोक जखमी झाले आहेत. रशियानेही ३.९२ लाख सैनिक गमावल्याचा युक्रेनचा दावा आहे.
युक्रेनमध्ये ब्लॅकआउट
रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये ब्लॅकआउट आहे. वीज निर्मिती कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे की, रशियन हवाई हल्ल्यामुळे लोकांचा आपत्कालीन वीजपुरवठाही खंडित झाला आहे. प्लांटमध्ये झालेल्या स्फोटामुळे वीज यंत्रणा कोलमडली असून, त्यामुळे सुमारे एक लाख लोक विजेशिवाय जगत आहेत. रशिया सतत वीज प्रकल्पांना लक्ष्य करत आहे.