मॉस्को - जवळपास महिना उलटला तरी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध निर्णायक टप्प्यावर पोहोचलेले नाही. युद्धामुळे युक्रेनमधील स्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे. याचदरम्यान, पाश्चात्य देशांना धमकावल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये आपल्या आण्विक पाणबुड्या रवाना केल्या आहेत. उत्तर अटलांटिक महासागराच्या आसपास युरोपमधील अनेक देश आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पाश्चात्य देशांना परिणाम भोगण्याची धमकी दिल्यानंतर एका दिवसानंतर आण्विक पाणबुड्यांना उत्तर अटलांटिकमध्ये पाठवण्यात आले आहे. पुतीन यांनी आक्रमणाच्या काही काळानंतर आपल्या न्यूक्लिअर डिटरेंट फोर्सना अलर्टवर राहण्याचे आदेश दिले होते. आता अनेक रशियन पाणबुड्या उत्तर अटलांटिक महासागरात उतरल्या आहेत. त्या १६ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना नेण्यास सक्षम आहेत. दरम्यान, पाश्चात्य देशांच्या गुप्तचर संघटना ह्या पुतीन यांच्या आण्विक हत्यारांच्या ताफ्यावर नजर ठेवून आहेत.
रशियाच्या सीमांबाबत महत्त्वाकांक्षी बनलेल्या पुतीन यांच्याकडे ४ हजार ४४७ आण्विक हत्यारांसह जगातील सर्वात मोठा आण्वस्त्रांचा साठा आहे. यामधील काही हजार अण्वस्त्रे ही खास पद्धतीने तयार करण्यात आली आहेत. ती शत्रूच्या ठराविक ठिकाणांना पूर्णपणे नष्ट करू शकतात. मात्र त्यामुळे व्यापक हानी होत नाही. य हत्यारांचा वापर तितकासा सोपा नाही. मात्र रशियाचे तज्ज्ञ हे बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे विकसित करण्यात निपुण आहेत.
एका पाश्चात्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या युद्धामध्ये आतापर्यंत युक्रेनला टार्गेट करून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांमध्ये अण्वस्त्रे लोड करण्यात आल्याचा कुठलाही पुरावा सापडलेला नव्हता. अटलांटिक कौन्सिलमध्ये स्कोक्रॉफ्ट स्टॅटर्जी इनिशिएटिव्हचे संचालक डॉ. मॅथ्यू क्रोनिन यांनी एजन्सीला सांगितले की, पुतीन यांनी दोन कारणांमुळे आपल्या अण्वस्त्रांना हायअलर्टवर ठेवले आहे. त्यातील एक कारण म्हणजे असे केल्याने रशिया अणूहल्ल्याच्या टप्प्यात येण्याची शक्यता कमी होईल, कारण रशियाची सर्व अस्त्रे ही एकाच ठिकाणी असतील आणि दुसरा म्हणजे शत्रूला जोरदार पलटवाराची भीती वारंवार सतावत राहील.