कीव्ह : युक्रेनच्या मारियुपोल शहरात रशियाच्या सैनिकांनी एका स्टील प्रकल्पावर हल्ला करून मोठे नुकसान केले. याचा आडोसा घेऊन लढणाऱ्या युक्रेन सैनिकांना लक्ष्य करण्यात आले. पूर्व युक्रेनमध्ये व्यापक हल्ले चढविण्यासाठी मारियुपोल कब्जात येणे रशियासाठी आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हल्ले सुरु होताच युक्रेन लगेच शरणागती पत्करेल असा रशिया अंदाज होता. परंतु ५५ दिवसांनतरही हा संघर्ष सुरुच आहे. युक्रेनचा पाडाव करण्यासाठी रशिया लहान अणुबॉम्ब म्हणजे सामरिक आण्विक शस्रांचा वापर करू शकतो, अशी भीती जाणकारांनी वर्तविली आहे. मारियुपोलमधील युक्रेनच्या सैनिकांनी शरण येण्यास नकार दिला . त्यामुळे रशियाला हे शहर बेचिराख करायचे असल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केला. मारियुपोलला वाचविण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी आम्हाला आणखी शस्त्रास्त्रांची मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. रशियाने मारियुपोलला वेढा आणखी घट्ट करीत नागरिकांची अन्नपाणी तोडले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.कीव्ह परिसरातून सैन्य मागे घेऊन रशियाने ते पूर्व युक्रेनच्या दिशेने वळविले. रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, मारियुपोलमधून युक्रेनच्या बहुतांश सैनिकांना हुसकावले आहे. उरलेले सैनिक अझोवत्साल स्टील प्रकल्पाच्या आश्रयाने लढत आहेत. त्यांचा नित्पात केल्यानंतर शहर रशियाच्या कब्जात येईल. डोनबास आणि लुहान्स्क या फुटीरतावादी प्रांतांच्या स्वातंत्र्याला रशियाने यााधीच मान्यता दिली आहे. आता हे प्रांत युक्रेनपासून तोडण्यासाठी रशियाने लक्ष केंद्रित केले आहे.
युक्रेनवर आता अणुहल्ला? रशिया अधिक आक्रमक; मारियुपोलवर कब्जा करण्याचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 5:59 AM