रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार संघर्ष सुरु असून युक्रेनवर हल्ला प्रकरण पुतीन यांना चांगलेच भारी पडले आहे. युद्ध एवढा काळ लांबेल असे कोणालाही वाटले नव्हते. आज युद्धाला २० दिवस झाले असून युक्रेनचे सैन्य आणि नागरिक त्वेषाने लढा देत आहेत. यामुळे आणखी काही काळ हे युद्ध असेच सुरु राहणार आहे. यामुळे रशियाला दारुगोळ्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. केवळ १० दिवसच पुरेल एवढा शस्त्रसाठा शिल्लक असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
अशावेळी जगातील दोन महासत्ता एकत्र आल्या आहेत. युक्रेनमध्ये हल्ले कमजोर होऊ लागल्याने रशियाने चीनकडे मदत मागितली होती. यावर चीनने रशियाला पैसा आणि शस्त्रास्त्रे पुरविण्यास होकार दिला आहे. अमेरिकेने चीनला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. तरी देखील चीनने रशियाला मदतीचा हात पुढे केला आहे. हल्ल्याच्या काही दिवस आधीच रशियाने चीनसोबत एक करार केला होता. त्यामध्ये चीनने रशियाचा गहू खरेदी करण्यास तयारी दर्शविली होती. आता पुन्हा चीनने रशियाला मदत केल्याने ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे.
अमेरिका आणि ब्रिटनच्या संरक्षण तज्ज्ञांनी रशियाकडे युक्रेनमध्ये लढण्यासाठी फारतर १० ते १४ दिवस पुरेल एवढाच शस्त्रसाठा आहे, असा दावा केला आहे. एकीकडे शस्त्रसाठा संपत असताना दुसरीकडे युक्रेनमध्ये सैन्य देखील पुढे जाऊ शकत नाहीय. यामुळे रशिया मोठ्या संकटात सापडला आहे. ज्या भागांवर रशियाने कब्जा केला आहे तिथे देखील युक्रेनने ताकद लावण्यास सुरुवात केली आहे.
सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या एका राजनैतिकाने सांगितले की, युक्रेन युद्धात चीनने रशियाला लष्करी आणि आर्थिक मदत देण्याचा पर्याय खुला ठेवल्याची माहिती अमेरिकेकडे आहे. मदतीच्या बदल्यात चीनला रशियाकडून काय हवे आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.