नवी दिल्ली- रशिया आणि युक्रेनमधील युद्ध २३व्या दिवशीही सुरूच आहे. दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्याच्या चर्चेला अद्याप यश आलेले नाही. याचदरम्यान पुन्हा एकदा रशियाने युक्रेनचे दुसरे मोठे शहर खारकीव्हमध्ये हवाई हल्ला केला आहे .
रशियाने युक्रेनमधील मारियुपोल शहराजवळील थिएटरवर हवाई हल्ला केला. येथील एका चित्रपटगृहावर बॉम्ब हल्ला करण्यात आला. या थिएटरमध्ये सुमारे १००० लोकांनी आश्रय घेतला होता. या हल्ल्यात २१ जण ठार तर अनेक जखमी झाल्याची माहिती आहे. बॉम्बस्फोटानंतर मोठ्या प्रमाणात लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.
दरम्यान, रशियाने युक्रेनवरील लष्करी हल्ले थांबवण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेशही फेटाळला. गुरुवारी रशियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश स्वीकारण्यास नकार दिला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी एक आदेश देत रशियाला युक्रेनवरील हल्ले त्वरित थांबवण्यास सांगितले होते.
चौकशीची मागणी करणारा ठराव संमत-
युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि त्यांच्या राजवटीच्या युद्ध गुन्ह्यांच्या चौकशीची मागणी करणारा ठराव अमेरिकेच्या सिनेटने एकमताने संमत केला. सिनेटर लिंडसे ग्रॅहम म्हणाले की, मानवतेविरोधातील गुन्हे, हिंसाचार आणि युद्ध गुन्ह्यांचा सिनेट कठोर शब्दात निषेध करीत आहे.
पुतिन यांच्या सांगण्यावरून रशियाचे लष्कर हे गुन्हे करीत आहे. त्यामुळे पुतिन, त्यांची सुरक्षा परिषद आणि लष्करी नेत्यांची युद्ध गुन्ह्यांसाठी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयांकडून चौकशी व्हायला हवी. या अत्याचारांचा युद्ध गुन्हे म्हणून तपास झाला पाहिजे, असे सिनेट मेजॉरिटी नेते चक शुमेर म्हणाले.