रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या तब्बल 67 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक वेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या. मात्र, अद्यापही युद्ध थांबलेले नाही. यातच रविवारी (1 मे) युक्रेनमधील ओडेसा येथे भीषण मिसाइल हल्ला करून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे नष्ट करण्यात आली असल्याचा दावा रशियाने केला आहे.
युक्रेनच्या ओडेसात रशियाचा भीषण हल्ला -रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाने रविवारी अमेरिका आणि युरोपीयन देशांनी युक्रेनसाठी पाठवलेल्या शस्त्रास्त्रांवर हल्ला केला. एवढेच नाही तर, ओडेसा शहराजवळ असलेल्या लष्करी विमानतळावरील धावपट्टीही रशियाने उद्ध्वस्त केली आहे. आपण लष्कराच्या विमानतळावर हल्ला करण्यासाठी ओनिक्स मिसाइलचा वापर केला, असेही रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
ओडेसाचे गव्हर्नर मॅक्सिम मार्चेंको म्हणाले, या हल्ल्यांसाठी रशियाने क्रिमियातून लॉन्च केलेल्या बॅस्टियन मिसाइलचा वापर केला. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, किनारी दक्षिण युक्रेनमध्ये युक्रेनचे सैनिक गावा-गावातून रशियाच्या आक्रमणाचा प्रतिकार करत आहेत. तसेच या भागातील लोक जीव वाचविण्यासाठी सुरक्षित जागा शोधत आहेत.