वॉश्गिंटन – गेल्या महिनाभरापासून रशिया-यूक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. रशियानं यूक्रेनच्या अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले केले. या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचाही बळी गेला. यूक्रेनवर सहज कब्जा मिळवता येईल अशी आशा ठेवून असणाऱ्या रशियाला यूक्रेनने चांगलेच जेरीस आणलं आहे. यूक्रेनच्या नागरिकांचा कडवट प्रतिकार पाहून रशियाही युद्धात काही पाऊल मागे असल्याचं दिसून येत आहे. जवळपास महिना झाला तरी रशियाला यूक्रेनवर कब्जा मिळवता आला नाही यातच त्यामागचे उत्तर दडलं आहे. त्यात यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियावर अमेरिकेसह नाटो देशांनी आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे.
व्हाईट हाऊसने शुक्रवारी सांगितले की, अमेरिका युक्रेनला जीव वाचवणारी उपकरणे पाठवत आहे. जर रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात रासायनिक किंवा जैविक शस्त्रे वापरली तर ही जीवरक्षक उपकरणे युक्रेनवासीयांना मदत करतील, त्यांचे संरक्षण होईल. रशियाकडून युक्रेनमध्ये रासायनिक किंवा जैविक शस्त्रे वापरण्याच्या क्षमतेबद्दल युनायटेड स्टेट्स आणि इंटरनॅशनल युनियनच्या सदस्यांनी वारंवार इशारा दिला आहे. अमेरिका युक्रेनला संरक्षणात्मक उपकरणे पुरवत आहे की नाही या प्रश्नाला उत्तर देताना व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन साकी यांनी ही माहिती दिली.
रशियाद्वारे रासायनिक शस्त्रांचा वापर होण्याची शक्यता पाहता अमेरिकेने यूक्रेनला हे जीवरक्षक उपकरणं पाठवली आहेत अशी पुष्टी जेन साकी यांनी केली आहे. त्याआधी नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी रशिया यूक्रेनवर रासायनिक शस्त्रांचा वापर करू शकते याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी यूक्रेनविरोधातील युद्धात रासायनिक शस्त्रांचा वापर केल्यास त्याचं सडेतोड उत्तर देऊ असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी दिला होता. ब्रेसेल्समध्ये झालेल्या शिखर संमेलनात बायडन यांनी रशियाला धमकीवजा इशारा दिला होता. युक्रेनची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी अमेरिकेने शुक्रवारी ३० कोटी डॉलर्स सुरक्षा मदतीचे वाटप केले. फेब्रुवारीच्या अखेरीस रशियाचं आक्रमण झाल्यापासून अमेरिका युक्रेनला सातत्याने आर्थिक मदत करत आहे.