युक्रेन-रशिया आता युद्धाच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. एवढेच नाही, तर युक्रेन-रशिया युद्ध आता टाळता येणार नाही, असेही पुतीन यांनी म्हटले आहे.
व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे, की रशिया विशेष लष्करी कारवाई सुरू करत आहे. युक्रेनचे निशस्त्रीकरण हे या कारवाईचे ध्येय आहे. युक्रेनच्या सैन्याला पुतिन यांनी शस्त्रे टाकून घरी जाण्यासही सांगितले आहे.
हस्तक्षेप करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील, पुतिन यांची धमकी -युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा करतानाच पुतीन यांनी मोठी धमकीही दिली आहे. पुतीन म्हणाले, 'बाहेरून कुणीही यात ढवळाढवळ केली तर त्याला असे परिणाम भोगावे लागतील, जे त्याने यापूर्वी कधीही अनुभवलेले नसतील. सर्व प्रकारचे आवश्यक निर्णय घेण्यात आले आहेत. आशा आहे, की आपण मला ऐकले असेल.
...म्हणून ही विशेष लष्करी कारवाई सुरूआपल्या आपत्कालीन भाषणात पुतिन म्हणाले, हा वाद आमच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्यांनी (युक्रेन) लाल रेषा ओलांडली आहे. युक्रेन निओ-नाझींचे समर्थन करत आहे. यामुळे आम्ही ही विशेष लष्करी कारवाई सुरू केली आहे.रशियाने आपल्या संबोधनात युक्रेनच्या सैनिकांनाही संबोधित केले. तुमचे पूर्वज नाझींसोबत लढले. कीवच्या (युक्रेनची राजधानी) नाझींच्या आदेशाचे पालन करू नका. शस्त्रे खाली ठेवा आणि घरी जा. याच वेळी पुतीन यांनी नाटोलाही इशारा दिला. याचा (लष्करी कारवाईचा) जो परिणाम येईल, त्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही आमच्या बाजूने सर्व निर्णय घेतले आहेत, असे पुतीन म्हणाले.